CoronaVirus News: खेड तालुक्यातील राक्षेवाडीत आणखी 4 जण कोरोनाबाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 08:30 PM2020-05-17T20:30:21+5:302020-05-17T20:30:43+5:30

एकाच कुटुंबातील एकूण पाच जण बाधित

CoronaVirus News four more covid 19 patient found in khed | CoronaVirus News: खेड तालुक्यातील राक्षेवाडीत आणखी 4 जण कोरोनाबाधित

CoronaVirus News: खेड तालुक्यातील राक्षेवाडीत आणखी 4 जण कोरोनाबाधित

Next

राजगुरुनगर: राक्षेवाडी(ता. खेड) येथील व्यक्ती कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्यानंतर या कुटुंबातील आणखी चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात बाधित व्यक्तीची पत्नी, शेजारी राहत असलेला बहिणीचा पती, बहिणीचा मुलगा (भाचा) आणि सासू यांचा समावेश आहे. यामुळे या कुटुंबात एकूण पाच जण बाधित झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

राक्षेवाडी येथील वाफगाव रोड येथे एका इमारती मध्ये बाधित कुटुंब राहत होते. तर शेजारील कॉलनीमध्ये बहीण राहत होती. कोरोनाबाधित व्यक्ती पुणे येथील रुग्णालयात कामाला आहे. त्याला कोरोनाची लागण झाल्याने त्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

कोरोनाग्रस्त व्यक्ती दिवसाआड पुण्यात जाऊन येऊन करीत होता. त्याचा थेट संपर्क आला म्हणुन कुटुंबातील पत्नी, मेहुणा, त्याची पत्नी,सासु,सासरा व भाचा आणि त्याची दोन लहान मुले यांसह बाधित व्यक्तीवर उपचार करणारे परिसरातील डॉक्टर, नर्स आणि आणखी एक असे ११ जण 'हाय रिस्क'  म्हणुन तपासणीसाठी जहांगीर व औंध रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील डॉक्टर, नर्स आणि एक जणाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तर आज कुटुंबातील चार जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना जहांगीर रुग्णालयात ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले.सासरा, भावजयी व  दोन मुलांचा रिपोर्ट अद्याप मिळालेला नाही. 

 दरम्यान, राक्षेवाडी येथे आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी भेट देऊन अधिकारी व स्थानिक पोलीस पाटील, ग्रामविकास अधिकारी यांच्याशी चर्चा केली. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, प्रांताधिकारी संजय तेली, तहसीलदार सुचित्रा आमले, पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी,गटविकास अधिकारी अजय जोशी, खेड पंच्यात समितीचे सभापती अंकुश राक्षे, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, डॉ. उदय पवार, मुख्याधिकारी मछिंद्र घोलप, पोलीस पाटील पप्पू राक्षे, ग्रामविकास अधिकारी तुषार साळुंके उपस्थित होते. यावेळी मुख्याधिकरी आयुष प्रसाद यांनी अधिकाऱ्यांकडून राक्षेवाडीत राबविण्यात येणारी यंत्रणा, अडचणी व उपाययोजना याबाबत चर्चा केली. यावेळी त्यांनी कोविड १९ चा सामना करण्यासाठी खासगी रुग्णवाहिकांची मदत घेण्याची परवानगी दिली. याबरोबरच येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या. कंटेन्मेंट झोन (संक्रमणशील) भागात असलेल्या गरोदर महिलांची काळजी घेण्यासाठी व त्यांना तत्पर सेवा देण्यासाठी विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या. याभागात नियम कडक करून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले.  

कंटेन्मेंट झोनसह बफर झोनमध्ये सर्वेक्षण करून सर्दी, खोकला, ताप असलेल्या व्यक्तींचे वर्गीकरण करून त्यांची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत लगेच द्यावी. ज्या नागरिकंना बीपी, मधुमेह सारखे आजार आहेत अथवा ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती आहेत अशा व्यक्तींचे सर्वेक्षण करून त्यांची काळजी घ्यावी. रॅपिड इन्वेस्टिंगेशन कडून वरिष्ठांना माहिती उपलब्ध करून द्यावी. जिल्हा परिषदेकडून पाहिजे ती मदत पुरवण्यात येईल. कोरोनारुग्ण वाढता कामा नये. राक्षेवाडीमध्ये धोका जास्त आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी. 
- आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी
 

Web Title: CoronaVirus News four more covid 19 patient found in khed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.