Coronavirus Baramati: मोरगावला पाच तास पुरेल एवढाच ऑक्सिजन शिल्लक; रुग्णाच्या नातेवाईकांची धावाधाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 17:59 IST2021-04-21T17:58:47+5:302021-04-21T17:59:07+5:30
मयुरेश्वर हॉस्पिटल कोविड केंद्रामध्ये ४२ रुग्ण कोरोना उपचार घेत आहेत. पैकी १२ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.

Coronavirus Baramati: मोरगावला पाच तास पुरेल एवढाच ऑक्सिजन शिल्लक; रुग्णाच्या नातेवाईकांची धावाधाव
मोरगाव: मोरगाव (ता.बारामती)येथील मयुरेश्वर अतिदक्षता विभागातील कोविड सेंटरमध्ये केवळ पाच तास पुरेल एवढा ऑक्सिजनचा साठा शिल्लक आहे . येथील रुग्णांच्या नातेवाईकांना पूर्वसूचना देत रुग्णांना इतर ठिकाणी ऑक्सिजन बेड पाहायला रुग्णालय व्यवस्थापनाकडून सांगितले आहे. यामुळे नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
मयुरेश्वर हॉस्पिटल कोविड केंद्रामध्ये ४२ रुग्ण कोरोना उपचार घेत आहेत. पैकी १२ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. हॉस्पिटलकडे केवळ चार ते पाच तास पुरेल एवढाच ऑक्सिजनचा साठा शिल्लक असल्याची माहिती हॉस्पिटलचे डॉक्टरांनी दिली आहे.
ऑक्सिजन उपलब्ध करुन मिळण्याबाबत बारामती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याशी हॉस्पिटल व्यवस्थापनाने संपर्क साधला आहे .
मोरगाव येथील वेल्डींग व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना सिलेंडर शिल्लक असल्यास मदत करण्याचे आवाहन हॉस्पिटलकडून करण्यात येत आहे. ऑक्सिजन मिळण्यासाठी शासन व खासगी पातळीवर या कोविड सेंटरकडुन प्रयत्न सुरु केले आहेत.मात्र, कोठेही ऑक्सिजन उपलब्ध न झाल्यास रुग्णांना इतर ठिकाणी अधिक उपचारासाठी हलवावे अशी पूर्वसूचना दिली असल्याने नातेवाईक व रुग्ण धास्तावले आहेत.