Corona virus : पुणे शहरात ऑक्सिजन बेडचा तुटवडा नाही : महापालिका आयुक्त विक्रम कुमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 13:41 IST2020-09-25T13:40:45+5:302020-09-25T13:41:03+5:30
आजमितीला शहरात ऑक्सिजन बेडचा तुटवडा नाही..

Corona virus : पुणे शहरात ऑक्सिजन बेडचा तुटवडा नाही : महापालिका आयुक्त विक्रम कुमार
पुणे : शिवाजीनगर येथील जम्बो हॉस्पिटल, बाणेर येथील कोविड हॉस्पिटलसह पालिकेच्या अन्य हॉस्पिटलमध्ये सद्यस्थितीला ३०० हून अधिक ऑक्सिजन बेड शिल्लक असून, आजमितीला शहरात ऑक्सिजन बेडचा तुटवडा नाही. मात्र व्हेंटिलेटर बेडची आणखी उपलब्धता करून देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
कुमार म्हणाले, जम्बो हॉस्पिटल आजमितीला ४०० बेडच्या क्षमतेने कार्यान्वित झाले असून, लवकरच येथे आणखी ४०० बेड सुरू करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.पीएमआरडीएच्या माध्यमातूनच नवीन ४०० बेड सुरू करण्यात येणार आहे. त्याकरिता नियोजित डॉक्टर्स आणि नर्सेसच्या नियुक्तीचा प्लॅन तयार आहे़ ‘मेटोब्रो' कंपनीला येथील व्यवस्थापनाचे काम दिले असून, त्यांनी ही यादी महापालिकेला दिली आहे.
जम्बो कोविड हॉस्पिटल मध्ये सुरूवातीला डॉक्टर्स, नर्सेस नाहीत. अन्य वैद्यकीय सहाय्यक मनुष्यबळ नाही, अशी ओरड होऊन हॉस्पिटलविषयी नकारात्मकता तयार झाली होती. मात्र, आता जम्बो हॉस्पिटलला बळ देऊन त्याची पुन:श्च उभारणी करण्यात आली आहे. ज्या कंपनीला हे काम देण्यात आले होते, त्यांना काढून टाकून ‘मेटोब्रो' कंपनीला ते दिले गेले आह़े. सदर कंपनीने व्यवस्थापनाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर, ४०० बेडचे नियोजन सद्यस्थितीत पूर्ण केले आहे. तर आणखी ४०० बेडचे नियोजन करण्यात आले आहे़ त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ कधी नियुक्त होणार याचा सगळा डाटा संबंधित कंपनीने हॉस्पिटलमध्ये नेमलेल्या कार्यकारी समितीकडे सूपूर्त केल्याचेही कुमार यांनी सांगितले.
---------------------------