Corona Virus : पुणेकरांनो,सावधान! दोन आठवड्यांपासून सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय..

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 11:59 AM2020-09-11T11:59:03+5:302020-09-11T12:14:09+5:30

रुग्णवाढीचा हाच दर कायम राहिला तर चिंता वाढण्याची लक्षणे

Corona Virus : People of Pune, beware! As the number of patients with active corona increases, care is essential, including the use of masks | Corona Virus : पुणेकरांनो,सावधान! दोन आठवड्यांपासून सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय..

Corona Virus : पुणेकरांनो,सावधान! दोन आठवड्यांपासून सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय..

Next
ठळक मुद्दे पुणे शहरातील रुग्णवाढीचा दर २४ वरुन २८ टक्क्यांवर दोन आठवड्यांपासून सक्रिय रुग्ण वाढले : मास्क वापरण्यासोबतच खबरदारी अत्यावश्यक

पुणे : शहरातील रुग्णवाढीचा दर गेल्या काही दिवसात २४ टक्क्यांवरुन २८ टक्क्यांवर गेला असून ही बाब चिंताजनक आहे. पुढील आठवड्यापर्यंत ही वाढ कमी होण्याची शक्यता आहे. ही वाढ कमी न झाल्यास चिंता वाढू शकते असे  पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.
कोरोनाचा आकडा दिवसागणिक फुगत चालला आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाण चांगले असले तरीदेखील बाधित होणाऱ्यांचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. दोन आठवड्यांपुर्वी पर्यंत बाधित होणाऱ्यांचे दिवसाकाठी सरासरी प्रमाण साडेचौदा हजार होते. परंतू, या आठवड्यात हे प्रमाण सोळा ते साडेसोळा हजारांच्या घरात आले आहे. सक्रिय रुग्णांचा आकडा दोन आठवड्यात एक हजारांची सरासरी वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक जबाबदारीने वागण्याची वेळ आली आहे.

लॉकडाऊनमधून शिथीलता देत अन लॉक सुरु करण्यात आले. केंद्र शासनापाठोपाठ राज्य शासनानेही सवलत दिल्यानंतर पालिकेनेही ब-याच प्रमाण निर्बंध हटविले. गणेशोत्सवानंतर रुग्णसंख्येमध्ये वाढ झाली आहे.  ऑगस्ट महिन्यामध्ये रुग्णवाढीची टक्केवारी २४ ते २५ टक्के आहे. तेच प्रमाण या महिन्यामध्ये २७ ते २८ टक्क्यांवर गेले आहे. कोरोना नागरिकांमध्ये पसरत चालल्याचे हे लक्षण असून दिवसाकाठी दोन हजारांपेक्षा अधिक रुग्णांची वाढ होत असल्याचे दिसत आहे. रुग्णवाढीचा हाच दर कायम राहिला तर चिंता वाढण्याची लक्षणे आहेत. पालिकेकडून पोलिसांच्या मदतीने उपाययोजना सुरु आहेत. आठवड्याभरात ही वाढ कमी होण्याची शक्यता असल्याचे आयुक्त कुमार यांनी सांगितले.
=====
पालिकेकडून पोलिसांच्या मदतीने मास्क न घालणा-या नागरिकांविरुद्ध दंडात्मक कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. ही कारवाई आणखी तीब्र करण्यात येणार असून नागरिकांनी स्वत:ची आणि इतरांची काळजी घ्यावी. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नये. प्रशासनाला सहकार्य करा. प्रशासकीय यंत्रणा सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र काम करीत आहे. नागरिकांनीही ही साथ गांभिर्याने घेऊन प्रशासकीय यंत्रणेला साथ द्यावी.
- विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका
====
शहरातील ७० टक्के बेड फक्त कोरोनासाठी
शहरातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांच्या एकूण क्षमतेपैकी ७० टक्के खाटा केवळ कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्याकरिता राखीव आहेत. उर्वरीत ३० टक्के खाटा या कॅन्सर, हृदयरोग, यकृताचे आजार आदी गंभीर आजारांच्या रुग्णांसाठी आहेत. एवढ्या कमी क्षमतेवर त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.
====
रुग्ण वाढ रोखण्याकरिता  ‘हे’ करा...
1. कोणत्याही सबबीशिवाय मास्क घालाच.
2. नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या घरी जाणे शक्यतो टाळा.
3. सातत्याने सॅनिटायझरचा वापर करा.
4. एकमेकांशी पुरेसे सुरक्षित अंतर राखून संवाद साधा.
5. गर्दी करणे, बाहेर खाणे टाळा.
6. लक्षणे दिसताच तात्काळ तपासणी करुन घ्या.
7. स्वत: सुरक्षित रहा आणि दुसऱ्यांना सुरक्षित ठेवा.

Web Title: Corona Virus : People of Pune, beware! As the number of patients with active corona increases, care is essential, including the use of masks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.