पिंपरी : ब्रिटनमधील नवीन कोरोनाच्या विषाणूचे रुग्ण शहरात आढळले आहेत. त्यात दोन तरूणांसह एका दोन वर्षीय मुलाचाही समावेश आहे. या तिघांचीही प्रकृती ठणठणीत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
कोरोनाचा विळखा सैल होत असतानाच आता ब्रिटनमधील नवीन कोरोनाच्या विषाणूचे रुग्ण शहरात आढळले आहेत. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. नवीन कोरोनाविरोधातील लढ्यासाठी महापालिकेच्या वतीने भोसरीतील रुग्णालय सज्ज ठेवले आहे.
चीनमध्ये कोरोनाने धुमाकुळ घातल्यानंतर पिंपरी-चिंचवड मार्चमध्ये शहरात पहिला रूग्ण सापडला होता. त्यानंतर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पिंपरी-चिंचवड शहरातही रूग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली. त्यानंतर ऑक्टोबरपासून रुग्ण संख्येत कमी होत आहे. कोरोनाचा विळखा सैल होत असतानाच ब्रिटनमधील नवीन स्ट्रेनचा विषाणू शहरात दाखल झाला आहे.
महापालिकेच्या वतीने सात जणांच्या घशातील द्रवाचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविले होते. त्यात तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे तिघेंजण ब्रिटनवरून २० डिसेंबरला मुंबईत आले होते. तेथून पिंपरी-चिंचवड शहरात आले. त्यावेळी महापालिकेने त्यांना क्वारंटाईन केले होते. त्यानंतर त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने तपासले असता अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर नवीन स्टेनचे बाधित आहेत, की नाही हे तपासण्यासाठी नमुने पाठविण्यात आले. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.तिघांमध्ये ४६ आणि ४७ वर्षीय व्यक्तीचा आणि दोन वर्षांचा लहान मुलाचाही समावेश आहे. या तिघांवर भोसरीतील रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.