कोरोनाने पुण्यात धडक दिली असून तेथील पाच जणांना लागण झाली आहे. या पार्श्वभुमीवर पुणे महापालिकेने काही तासांत 300 खाटांचा वेगळा विभाग उभारला असून औषधांचा साठाही मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. कोरोना व्हायरसवरील उपचार घेताना लोकांना आता खर्चाच्या चिंतेने ग्रासले आहे. मात्र, यासाठी घाबरून जाण्याची गरज नाही.
कोरोना व्हायरस ही लोकांना जिवावर बेतणारे संकट वाटत आहे. या आजारावर मात करण्यासाठी सरकारने त्यांच्या खर्चाने तयारी केली आहे. यामुळे घाबरण्याची काळजी नाही. तरीही ताप, सर्दी असल्यास खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यास त्याचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. अशावेळी तो रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यास हा रोगच कोणत्याही मेडिक्लेम पॉलिसीमध्ये नसल्याने इन्शुरन्स कंपन्या क्लेम नाकारण्याची शक्यता होती.
मात्र, विमा कंपन्यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या इरडाने विमा कंपन्यांना सूचना केल्या आहेत. यामध्ये ज्या मेडिक्लेममध्ये हॉस्पिटलचा खर्च सहभागी आहे त्यामध्ये कोरोना व्हायरसशी संबंधीत खर्चाचाही तात्काळ समावेश करावा असे सांगितले आहे. हे आदेश इरडा कायदा, 1999 च्या कलम 14 (2) (e) नुसार जारी करण्यात आले आहेत.
भारतात कोरोना व्हाय़रसच्या संक्रमित रुग्णांची संख्या 60 वर गेली आहे. तर कर्नाटकमध्ये एका 76 वर्षीय संशयीत व्य़क्तीचा मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रात एकट्या पुण्यात 5 जण सापडले आहेत.