कोरोना लस दोनशे रुपयात जगात कुठेही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:27 IST2021-01-13T04:27:50+5:302021-01-13T04:27:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “केंद्र सरकारच्या खास विनंतीवरुन आणि देशातल्या सर्वसामान्यांसाठी कोविशिल्ड लस दोनशे रुपयांमध्ये आम्ही सरकारला देत ...

The corona vaccine is nowhere in the world for two hundred rupees | कोरोना लस दोनशे रुपयात जगात कुठेही नाही

कोरोना लस दोनशे रुपयात जगात कुठेही नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “केंद्र सरकारच्या खास विनंतीवरुन आणि देशातल्या सर्वसामान्यांसाठी कोविशिल्ड लस दोनशे रुपयांमध्ये आम्ही सरकारला देत आहोत. युरोप, अमेरिका, रशिया, चीन आदी जगात कुठेही एवढ्या कमी किमतीत ही लस कोणीही उपलब्ध करुन दिलेली नाही,” अशी माहिती सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांनी दिली.

‘सिरम’मध्ये उत्पादीत झालेल्या कोविड-१९ वरील कोविशिल्ड लस मंगळवार (दि. १२)पासून पहिल्यांदाच देशभर पाठवण्यास सुरुवात झाली. त्यानंतर पुनावाला माध्यमांशी बोलत होते. येत्या फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या तीन महिन्यात दोनशे रुपये प्रती डोस याच दराने तब्बल दहा कोटी डोस पुरवण्याचे आश्वासन आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

सिरममध्ये उत्पादीत होणाऱ्या लशीच्या किमतीवरुन लोकांमध्ये खूप उत्सुकता आहे. या संदर्भात पुनावाला यांनी सांगितले की, मोदी सरकारसाठी आम्ही ‘स्पेशल प्राईस’ दिली आहे. मात्र खासगी वितरणासाठी जेव्हा आम्हाला परवानगी मिळेल तेव्हा हाच डोस एक हजार रुपयांना विकला जाईल. तत्पुर्वी मात्र देशातल्या सर्वसामान्य कॉमन माणसापर्यंत कोरोना लस पोहोचवण्याचे आव्हान आमच्यासमोर आहे. ज्येष्ठ नागरिक, व्याधीग्रस्त, वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत लोक यांना प्राधान्याने लस दिली जाणार आहे.

दरम्यान, सिरमच्या कोविशिल्ड लशीचे ९ लाख ६३ हजार आणि भारत बायोटेक कंपनीच्या कोव्हँक्सिनचे २० हजार असे ९ लाख ८३ हजार डोस महाराष्ट्राला मिळणार आहेत. आतापर्यंत राज्यातल्या ७ लाख ५५ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोना लसीसाठी नोंदणी केली आहे. या लसीकरणाचा कार्यक्रम लवकरच चालू होणार आहे.

चौकट

भावनात्मक क्षण

“दर महिन्याला पाच ते सहा कोटी कोविशिल्ड डोस तयार करण्याचे उद्दीष्ट आम्ही ठेवले आहे. पहिल्यांदा देशात पुरेसा पुरवठा झाल्यानंतर इतर देशांना पुरवठा करण्यासंदर्भात विचार केला जाईल. गेले आठ-नऊ महिने संशोधन, चाचण्या, विविध परवानग्या, उत्पादन अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर खूप आव्हानात्मक होते. मात्र या सर्व वाटचालीत आमच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी योगदान देत आज अखेरीस लस सर्वसामान्य देशवासियांपर्यंत पोहोचवली. आमच्यासाठी हा भावनात्मक क्षण आहे.” - आदर पुनावाला, सीईओ, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया

Web Title: The corona vaccine is nowhere in the world for two hundred rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.