Corona Vaccine Dispute Pune: पुण्याच्या बड्या कंपनीने कोरोना लसीचा फॉर्म्युला चोरला; ठोकला 7200 कोटींचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 14:15 IST2022-03-23T14:15:44+5:302022-03-23T14:15:56+5:30
Emcure's subsidiary Gennova Corona vaccine: कोरोना लस बनविण्यास काही कंपन्यांना लवकर यश आले काहींनी उशिरा. आता यावरून वाद सुरु झाले आहेत. अमेरिकेच्या फार्मा कंपनीने पुण्याच्या बड्या कंपनीवर खटला दाखल केला आहे.

Corona Vaccine Dispute Pune: पुण्याच्या बड्या कंपनीने कोरोना लसीचा फॉर्म्युला चोरला; ठोकला 7200 कोटींचा दावा
कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात मोठमोठ्या कंपन्यांनी कोरोना प्रतिबंधक लस बनविण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली. होता नव्हता तो पैसा आणि हुशारी ओतली होती. काही कंपन्या यासाठी एकत्र आल्या. यामध्ये काही कंपन्यांना लवकर यश आले काहींनी उशिरा. आता यावरून वाद सुरु झाले आहेत. अमेरिकेच्या फार्मा कंपनीने पुण्याच्या बड्या कंपनीवर खटला दाखल केला आहे. यामध्ये आपला कोरोना लसीचा फॉर्म्युला चोरून त्यांनी लस उत्पादित केल्याचा आरोप केला आहे.
अमेरिकेच्या एचडीटी बायो कॉर्पने वॉशिंग्टनमधील न्यायालयात पुण्याच्या एमक्युअरविरोधात ९५ कोटी डॉलर्सचा दावा दाखल केला आहे. यामुळे फार्मा इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली आहे. एचडीटी बायोने म्हटले आहे की, पुण्याच्या कंपनीने नवीन कोरोना लशीचा फॉर्म्युला चोरला होता आणि त्याचे उत्पादन केल्याचे म्हटले आहे. एमक्युअरची उपकंपनी जेनोवाला या कंपनीने भारतात कोरोना लस बनविणे आणि विकण्याचे लायसन दिले होते.
नवीन लस पेशींना रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे आरएनए पोहोचविण्यासाठी लिपिड अकार्बनिक नॅनोपार्टिकल-लायओन फॉर्म्युलेशन वापरते. जुलै 2020 मध्ये, HDT Bio ने संभाव्य कोरोना लसीसाठी मेसेंजर किंवा mRNA तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी जेनोआ बायोफार्मास्युटिकल्ससोबत करार केला होता.
या प्रकरणाबद्दल विचारले असता, एमक्योरच्या प्रवक्त्याने सांगितले की "परवाना करार, जो खटल्याचा विषय आहे, जेनोआ बायोफार्मास्युटिकल्स आणि एचडीटी यांच्यात आहे. एमक्योर फार्माचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. खटल्यात पक्षकार म्हणून चुकीच्या पद्धतीने गोवले गेले आहे. हा दावा रद्द करण्यासाठी कंपनी आवश्यक कायदेशीर पावले उचलणार आहे. कराराच्या किंवा कायद्याच्या तरतुदींचे कोणतेही आमच्यावर बंधन नाही, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.