कोरोना चाचण्या १० हजारांपुढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:10 IST2020-12-06T04:10:29+5:302020-12-06T04:10:29+5:30
पुणे : आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यांना लोकसंख्येच्या तुलनेत चाचण्या करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे जिल्हाला दररोज सुमारे १८ ...

कोरोना चाचण्या १० हजारांपुढे
पुणे : आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यांना लोकसंख्येच्या तुलनेत चाचण्या करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे जिल्हाला दररोज सुमारे १८ हजार चाचण्यांचे उद्दिष्ट देण्यात आले असून सध्या १० ते ११ हजार चाचण्या होत आहेत. चाचण्यांसाठी येणारे संशयितांचे प्रमाण कमी असल्याने चाचण्या कमी होत असल्याचा दावा जिल्ह्याच्या आरोग्य विभागाकडून केला जात आहे. पण जिल्ह्यात दररोज २० हजारांपर्यंत चाचण्या करण्याची क्षमता असल्याचेही अधिकाºयांनी सांगितले.
राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी सर्व जिल्ह्यांना दैनंदिन चाचण्यांचे उद्दिष्ट दिले आहे. त्यानुसार राज्यात दररोज सुमारे १ लाख ५८ हजार चाचण्या करण्याचे ठरविण्यात आले आहे. जिल्ह्यांची लोकसंख्या, पॉझिटिव्हिटी दर याप्रमाणे चाचण्या वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहे. राज्यात पुणे जिल्हा हा कोरोनाचा हॉटस्पॉट होता. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात आरटी-पीसीआर आणि अँटीजेन अशा दोन्ही मिळून दररोज १४ हजारांच्या जवळपास चाचण्या होत होत्या. ऑक्टोबर महिन्यानंतर हे प्रमाण कमी होत गेले. मात्र, दिवाळीनंतर पुन्हा चाचण्यांमध्ये वाढ करण्यात आली असून हा आकडा आता १० हजारांच्या पुढे गेला आहे. पुढील काळात चाचण्यांमध्ये आणखी वाढ केली जाणार आहे.
-------------
उद्दिष्ट पुर्ण करणे शक्य
आरोग्य सचिवांनी दिलेल्या सुचनांनुसार ७५ टक्के चाचण्या आरटीपीसीआर तर २५ टक्केच चाचण्या अँटीजेन असाव्यात, असे स्पष्ट केले आहे. जिल्ह्याची आरटी-पीसीआर चाचणी करण्याची क्षमता जवळपास १५ हजारांवर जाऊ शकते. तर दररोज ५ हजारांहून अधिक अँजीजेन चाचण्या होऊ शकतात. त्यामुळे आरोग्य विभागाने दिलेले उद्दिष्ट गाठणे शक्य आहे. पण सध्या चाचणीसाठी येणारे संशयित रुग्णांचे प्रमाण कमी आहे. दिवाळीपर्यंत हा आकडा ५ ते ६ हजारापर्यंतच होता. दिवाळीनंतर काही दिवसांतच चाचण्यांमध्ये वाढ झाली आहे. तसेच रुग्णसंख्याही दिवाळीपुर्वीपेक्षा काही प्रमाणात वाढली आहे.
------------
सर्वाधिक चाचण्या
पुणे जिल्ह्यामध्ये सध्या १० लाख लोकसंख्येमागे तब्बल १ लाख ३९ हजार चाचण्या होत आहेत. राज्यातील हे प्रमाण ६९ हजार ४५७ एवढे असून देशातील हे प्रमाण ८२ हजारांपर्यंत गेले आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
------------
सध्या होत असलेल्या चाचण्या - १० ते ११ हजार
क्षमता - सुमारे २० हजार (आरटी-पीसीआर व अँटीजेन)
-----------------