Pune Corona News: शहरात रुग्णवाढीचा वेग चिंताजनक; रविवारी तब्बल ५२४ नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2022 18:25 IST2022-01-02T18:25:40+5:302022-01-02T18:25:59+5:30
सध्या विविध रुग्णालयात ९९ गंभीर रुग्णांवर तर ७२ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू

Pune Corona News: शहरात रुग्णवाढीचा वेग चिंताजनक; रविवारी तब्बल ५२४ नवे रुग्ण
पुणे : शहरातील कोरोनाबधितांची संख्या गेल्या काही दिवसांपासून दररोज शेकड्यांनी वाढत चालली असून, रविवारी ( दि.२) तब्बल ५२४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाबधितांची टक्केवारी थेट ७.७ टक्क्यांवर गेली असून, नववर्षाच्या सुरुवातीला होणारी ही वाढ शहराच्या दृष्टीने चिंताजनक आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात ६ हजार ७८६ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून, यापैकी ७.७२ टक्के कोरोनाबाधित आढळून आले आहेत. गेल्या चार-पाच दिवसांपासून दररोजच्या मोठया रुग्ण वाढीमुळे, रविवारी शहरातील सक्रिय रुग्ण संख्या अडीच हजारांवर गेली आहे. गेल्या रविवारी ( दि.२६) ९८१ इतकीच होती. आठ दिवसात यामध्ये दीड हजारने वाढ झाली आहे. आजमितीला शहरातील सक्रिय रुग्णसंख्या २ हजार ५१४ इतकी आहे. सध्या विविध रुग्णालयात ९९ गंभीर रुग्णांवर तर ७२ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. आज दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण पुण्याबाहेरील आहे.
आतापर्यंत ३८ लाख ७९ हजार ४८७ जणांनी कोरोना चाचणी करून घेतली असून, यापैकी ५ लाख ११ हजार १४१ जण बाधित आढळून आले आहेत. यातील ४ लाख ९९ हजार ५०९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ९ हजार ११८ जण दगावले आहेत.