संमेलन निवडणूक प्रक्रिया सदोष
By Admin | Updated: November 26, 2015 00:43 IST2015-11-26T00:43:29+5:302015-11-26T00:43:29+5:30
पिंपरी चिंचवड येथे होणार असलेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षाची निवडणूक प्रक्रिया सदोष असल्याचा आरोप अनुबंध प्रकाशनचे अनिल कुलकर्णी यांनी केला आहे.

संमेलन निवडणूक प्रक्रिया सदोष
पुणे : पिंपरी चिंचवड येथे होणार असलेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षाची निवडणूक प्रक्रिया सदोष असल्याचा आरोप अनुबंध प्रकाशनचे अनिल कुलकर्णी यांनी केला आहे. निवडणूक प्रक्रियेतील कागदपत्रांचे पुरावे कुलकर्णी यांनी माहिती अधिकाराच्या कक्षेत मागवले आहेत. त्याबाबत त्यांनी साहित्य महामंडळाकडे अर्ज केला आहे.
अर्जात नमूद केल्यानुसार, निवडणुकीपूर्वी छापल्या गेलेल्या मतपत्रिकांची प्रेसची पावती, पोस्टाने पाठवलेल्या मतपत्रिकांची हाताळणी पावती व बिले, ज्या सभासदांना मतपत्रिका मिळाल्या नाहीत, त्यांनी दुसऱ्या पत्रिकांसाठी निर्वाचन अधिकाऱ्यांकडे केलेला अर्ज, पोस्टाने आलेल्या मतपत्रिकांची संख्या, सभासदांची नावे, एकगठ्ठा मतदान कोणी आणि कोणत्या भागातून आणले आदि कागदपत्रांच्या प्रती आणि नोंदींची माहिती अनिल कुलकर्णी यांनी मागितली आहे.
प्रत्येक मतपत्रिकांवर मतदारांचे नाव, पत्ता, मतदार क्रमांक, सही इत्यादी सविस्तर माहिती असते. निर्वाचन अधिकाऱ्यातर्फे त्याची नोंद ठेवली जाते. तसेच, प्रत्येक मतपत्रिका कधी आली याची तारखेनुसार नोंद करण्यात आलेली असते. ही नोंद झालेल्या प्रतीही त्यांनी माहिती अधिकाराच्या कक्षेत मागितल्या आहेत. भोपाळला ५० दुबार मतपत्रिका पाठवल्या होत्या. त्या पत्रिकांसाठी मतदारांचे अर्ज आले होते का, की संस्थेच्या अध्यक्षांनी केलेल्या मागणीनुसार निर्वाचन अधिकाऱ्याने कोणतीही शहानिशा न करता, मतपत्रिका पाठवल्या, याबाबतही त्यांनी शंका व्यक्त केली. (प्रतिनिधी)