नियंत्रण कक्ष कालबाह्य
By Admin | Updated: March 21, 2016 00:58 IST2016-03-21T00:58:55+5:302016-03-21T00:58:55+5:30
शहरात कोणतीही दुर्घटना, अपघात, आगीची घटना घडल्यास नागरिकांकडून पहिला फोन जिथे जातो, त्या अग्निशमन दलाचा नियंत्रण कक्षच अत्यवस्थ अवस्थेत आहे.

नियंत्रण कक्ष कालबाह्य
पुणे : शहरात कोणतीही दुर्घटना, अपघात, आगीची घटना घडल्यास नागरिकांकडून पहिला फोन जिथे जातो, त्या अग्निशमन दलाचा नियंत्रण कक्षच अत्यवस्थ अवस्थेत आहे. दुर्घटनेच्या वेळी तत्काळ कुमक व मदत पोहोचविण्याची जबाबदारी असलेल्या या कक्षातील ईपीबीएक्स बॉक्समध्ये बिघाड झाल्याने अंतर्गत संपर्क यंत्रणा कोलमडून पडली आहे. नियंत्रण कक्षातील शुक्रवारी अचानक बंद पडलेल्या दोन फोन लाइनची दुरुस्ती झाली असली तरी त्या पुन्हा कधी बंद पडतील याची शाश्वती राहिलेली नाही. त्यामुळे मोठ्या आत्पकालीन प्रसंगी तत्काळ व पुरेशी मदत पोहोचण्यात अग्निशमन प्रशासनास अपयशी ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शहरामध्ये आत्पकालीन प्रसंगी तत्काळ मदत उपलब्ध करून देणे ही बीपीएमसी अॅक्टनुसार महापालिका प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यासाठी शहरामध्ये मुख्य अग्निशमन केंद्रासह १५ उपकेंद्रे कार्यरत आहेत. या केंद्रामध्ये ५०० अधिकारी व जवान कार्यरत आहेत. अग्निशमन दलाची सर्वाधिक भिस्त ही नियंत्रण कक्षावर अवलंबून असते. एखादी दुर्घटना घडल्यानंतर तत्काळ नजीकच्या केंद्राशी संपर्क साधून काही मिनिटांत अग्निशमनचे जवान त्या ठिकाणी पोहोचणे अपेक्षित असते, त्यासाठी नियंत्रण कक्षातून वेगाने हालचाली कराव्या लागतात.
भवानी पेठेतील मुख्य अग्निशमन केंद्रामध्ये नियंत्रण कक्ष कार्यरत आहे. नियंत्रण कक्षाचे ३ शिफ्टमध्ये काम चालते. एका शिफ्टमध्ये २० ते २५ जवान कार्यरत असतात. या कक्षामध्ये अद्यापही जुनाट यंत्रणेद्वारेच काम पाहिले जात आहे. तंत्रज्ञानामध्ये वेगाने प्रगती झाल्याने पोलीस, गुन्हे शाखा व इतर महत्त्वाच्या सरकारी कार्यालयांची नियंत्रण कक्ष अत्याधुनिक झाली असताना अग्निशमन दलाचे नियंत्रण कक्ष मात्र खूप वर्षे मागे आहे. या कक्षाचे अद्याप संगणकीकरण झालेले नाही. येणारे कॉल्सची माहिती रजिस्टरवर नोंदवून ठेवावी लागते. ईपीबीएक्स बॉक्स बंद पडल्याने आता अंतर्गत फोनची यंत्रणाही बंद झाली आहे. त्यामुळे मोबाइलचा आधार आत्पकालीन प्रसंगात जवानांना घ्यावा लागतो आहे. भूकंप व इतर मोठ्या दुर्घटनामध्ये मोबाइलचे नेटवर्क आपोआप बंद पडते. त्या वेळी मोबाइलवर अवलंबून राहणे अत्यंत धोकादायक ठरू शकते.
नियंत्रण कक्षातील ईपीबीएक्स बॉक्समध्ये शॉटसर्किट होऊन तो बंद पडला आहे, त्याच्या दुरुस्तीसाठी वेळ लागणार आहे. मात्र यामुळे कक्षात काम करणे जवानांना खूप अवघड झाले आहे. नेमका कोणता फोन वाजतो आहे, हेच त्यांच्या लक्षात येत नाही.
आत्पकालीन यंत्रणेचा स्मार्ट सिटीला विसर
महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी ३ हजार कोटी रुपये खर्चाचा स्मार्ट सिटी आराखडा जाहीर केला आहे. मात्र, प्रकल्पात आत्पकालीन यंत्रणेचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही. मोबाइल अॅप, सॉफ्टवेअर, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बरेच काही घरबसल्या देण्याची कल्पना त्यांनी त्यामध्ये मांडली आहे. मात्र, आत्पकालीन यंत्रणेचा महत्त्वाचा भाग असलेल्या अग्निशमनच्या जुनाट यंत्रणेमध्ये बदल करण्याचा पालिका प्रशासनाला विसर पडला आहे.