बेफिकीर ठेकेदारालाच पुन्हा ठेका
By Admin | Updated: July 8, 2015 02:47 IST2015-07-08T02:47:45+5:302015-07-08T02:47:45+5:30
शहरामध्ये घराघरांत जाऊन औषध फवारणी करण्यासाठी कामगार पुरविण्याच्या कामात निष्काळजी केल्याप्रकरणी अनेक तक्रारी झालेल्या ठेकेदारालाच पुन्हा कामगार

बेफिकीर ठेकेदारालाच पुन्हा ठेका
पुणे : शहरामध्ये घराघरांत जाऊन औषध फवारणी करण्यासाठी कामगार पुरविण्याच्या कामात निष्काळजी केल्याप्रकरणी अनेक तक्रारी झालेल्या ठेकेदारालाच पुन्हा कामगार पुरविण्यासाठी ४२ लाख ५० हजार रुपयांच्या ठेक्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची शिफारस झालेली असतानाही त्याला पुन्हा काम देण्यात आले आहे.
शहरात साथीचे रोग पसरू नये म्हणून घरोघर जाऊन अॅबेट या औषधाची फवारणी केली जाते. साधरणत: जुलै ते आॅक्टोबर या ४ महिन्यांच्या कालावधीसाठी ठेकेदारामार्फत १५० कंत्राटी कामगार घेतले जातात. यंदाच्या २०१५-१६ या वर्षाकरिता दिशा एजन्सी व श्री एंटरप्रायझेस या दोन ठेकेदारांना प्रत्येकी ४२ लाख ५० हजार असे ८५ लाख रुपयांच्या टेंडरच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
दिशा एजन्सीच्या ठेकेदाराचे काम व्यवस्थित नसल्याने त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याचा प्रस्ताव ३ जून २०१४ रोजी ठेवण्यात आलेला आहे. या ठेकेदाराने कामगारांना वेळेवर पगार दिला जात नाही. क्षेत्रीय कार्यालयांतर्गत किती कामगार कार्यरत आहेत, याची माहितीच ठेकेदाराला नाही. कामगाराने दररोज फवारणी करण्यासाठी दिलेल्या घरांचे टार्गेट पूर्ण केले जात नाही, अशा प्रकारच्या तक्रारी आरोग्य प्रमुखांकडे करण्यात आल्या होत्या. त्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, असा शेराही आरोग्य प्रमुखांनी दिला होता. मात्र, यंदा औषध फवारणीसाठी टेंडर मंजूर करताना पुन्हा त्याच ठेकेदारासह दोघांचे टेंडर आरोग्य विभागाने मंजूर केले आहे. (प्रतिनिधी)