समाजकार्यात जाणीवपूर्वक या
By Admin | Updated: May 23, 2016 01:31 IST2016-05-23T01:31:56+5:302016-05-23T01:31:56+5:30
विविध क्षेत्रांत महिलांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. विकासकामांत महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. त्यामुळे महिलांनी घरगुती जबाबदारीबरोबरच सामाजिक कार्यात जाणीवपूर्वक सहभाग घ्यावा

समाजकार्यात जाणीवपूर्वक या
पिंपरी : विविध क्षेत्रांत महिलांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. विकासकामांत महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. त्यामुळे महिलांनी घरगुती जबाबदारीबरोबरच सामाजिक कार्यात जाणीवपूर्वक सहभाग घ्यावा, असे प्रतिपादन धम्मविनया संस्थेच्या अध्यक्षा भिक्षुणी सुमना यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२५वी जयंती व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त पुणे येथील धम्मविनया सामाजिक संस्थेच्या वतीने महिला ज्ञान मेळाव्याचे आयोजन संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या. श्रामणेरी दीक्षा सोहळा, धम्मविनया संस्थेच्या वेबसाइटचे अनावरण, प्रवचन, धार्मिक, सामाजिक महिला संघाच्या कार्याचे पुरस्कार वितरण असे विविध कार्यक्रम झाले. भंते नागघोष महाथेरो, भंते नंदपाल थेरो, भंते चंद्रज्योती, भंते महेंद्र बोधी, भिक्षुणी सत्यरक्षिता, श्यामल जेटीथोर, शीलरतन बंगाळे, कविता वडवेकर, वर्षा चौरे, नीलम जेटीथोर उपस्थित होते.
बुद्धवंदनाने सुरुवात झाल्यानंतर श्रामणेरी दीक्षा सोहळा पार पडला. २३वर्षीय अभियंता नेहा जाज यांनी दीक्षा ग्रहण केली. पश्चिम महाराष्ट्रातील त्या पहिल्या श्रामणेरी आहेत. सुमना यांच्या हस्ते भारतातील महिलांची पहिली बौद्ध धम्म वेबसाइटचे अनावरण करण्यात आले.
सुमना यांचे ‘बौद्ध धर्माची मानवजातीला आवश्यकता’ यावर प्रवचन झाले. स्नेहल गायकवाड यांनी ‘बाबासाहेबांचे महिलांसाठीचे योगदान’ यावर, सहायक आयुक्त डॉ. पंचशीला दुर्गे यांनी ‘महिलांचे सामाजिक क्षेत्रातील स्थान’ यावर आणि सुजाता भालेराव यांनी ‘स्त्रियांचे राजकीय क्षेत्रातील स्थान’ या विषयावर मत व्यक्त केले. भिक्षुणी सत्यरक्षिता यांनी ‘धम्मातील स्त्रियांचे स्थान’ यावर प्रवचन केले. सविता बंगाळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)