कॉँग्रेस इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी

By Admin | Updated: August 20, 2015 02:26 IST2015-08-20T02:26:25+5:302015-08-20T02:26:25+5:30

आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने शहर कार्यकारिणीत बदल करण्यात येणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दोन महिन्यांपूर्वी जाहीर केले होते

Congress wants water on the minds of the seekers | कॉँग्रेस इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी

कॉँग्रेस इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने शहर कार्यकारिणीत बदल करण्यात येणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दोन महिन्यांपूर्वी जाहीर केले होते. त्यामुळे इच्छुकांकडून शहराध्यक्षपदासाठी मुंबईला लॉबिंग सुरू आहे. मात्र, शहर कार्यकारिणीत तूर्तास कोणतेही बदल होणार नसल्याचे संकेत काँग्रेसचे राज्य प्रभारी मोहन प्रकाश यांनी बुधवारी दिले. त्यामुळे काँग्रेसमधील इच्छुकांचा अपेक्षाभंग झाला.
शहरातील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला. त्या वेळी शहराध्यक्ष अ‍ॅड. अभय छाजेड यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा दिला होता. परंतु, तत्कालीन प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी छाजेड यांचा राजीनामा स्वीकारला नाही. मात्र, प्रदेशाध्यक्षपदी दोन महिन्यांपूर्वी अशोक चव्हाण
यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर पुन्हा शहराध्यक्ष व शहर कार्यकारिणीत बदल करण्याची चर्चा सुरू झाली.
खुद्द अशोक चव्हाण यांनी एक महिन्यात बैठक घेऊन शहरातील कार्यकारिणीत फेरबदल करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे गेल्या महिनाभरात शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी चव्हाण व
मोहन प्रकाश यांना समर्थकांसह भेटून लॉबिंग सुरू केले होते. शहर काँग्रेसतर्फे आयोजित राजीव गांधी जीवन दर्शन छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी मोहन प्रकाश बुधवारी पुण्यात आले होते. त्या वेळी शहराध्यक्षपदासाठी इच्छुक माजी आमदार रमेश बागवे, मोहन जोशी, उपमहापौर आबा बागुल, नगरसेवक संजय बालगुडे, मुख्तार शेख, संगीता देवकर, नीता रजपूत आदी मोहन प्रकाश यांच्या स्वागतासाठी मोठ्या अपेक्षेने उपस्थित होते. मात्र, शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची कोणतीही बैठक न घेता मोहन प्रकाश हे तातडीने कोल्हापूरला कार्यक्रमासाठी रवाना झाले. तसेच, पत्रकारांशी बोलतानाही त्यांनी तूर्तास कोणतीही बदल करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी पडल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

Web Title: Congress wants water on the minds of the seekers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.