पुणे: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज्याच्या एकूण प्रौढ लोकसंख्येपेक्षा तब्बल १६ लाख जास्त मतदार असल्याची हरकत अखिल भारतीय काँग्रेस समितीने आता निवडणूक आयोगावर घेतली आहे. पक्षाचे केंद्रीय महासचिव प्रमोद चक्रवर्ती यांनी यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र दिले असून त्यात यासंदर्भात आयोगाने खुलासा करावा अशी मागणी केली आहे.
चक्रवर्ती यांनी म्हटले आहे की आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या लोकसंख्येवरील राष्ट्रीय आयोगाच्या नोव्हेंबर २०१९ च्या अहवालाच्या पृष्ठ क्रमांक २२९ वर, २०२४मध्ये महाराष्ट्राची अंदाजे प्रौढ (१८ ) लोकसंख्या ९.५४ कोटी इतकी मोजली जाऊ शकते, जी पाच वर्षांच्या अंदाजांवर आधारित आहे. प्रत्यक्षात निवडणूक आयोगाच्या नोंदींनुसार विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात एकूण ९.७० कोटी मतदार नोंदणीकृत होते. म्हणजेच नरेंद्र मोदी सरकारच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील संपूर्ण प्रौढ लोकसंख्येपेक्षा १६ लाख अधिक मतदारांची नोंदणी निवडणूक आयोगाने केल्याचे दिसते.
इतर राज्यांमधील मतदार नोंदणीची आकडेवारी लक्षात घेतली तर असे दिसते की आयोगाकडून कितीही प्रयत्न झाले तरी एकूण मतदारसंख्येच्या जास्तीतजास्त ९० टक्के मतदारांची नोंदणी केली जाऊ शकतो. असे असताना महाराष्ट्रात मात्र आयोगाने प्रत्यक्षातील प्रौढ मतदारसंख्येच्या नोंदणीपेक्षाही तब्बल १६ लाख मतदारांची जास्त नोंदणी केली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेसने, एकूण मतदार, झालेले मतदान, त्याची तफावत असलेली आकडेवारी अशा अनेक हरकती घेतल्या, मात्र आयोगाने त्यापैकी कशाचाच समाधानकारक खुलासा केलेला नाही. लोकशाहीच्या आणि मतदारांच्या विश्वासाला बळकटी देण्यासाठी आयोगाने किमान या वाढलेल्या मतदार नोंदणीचा तरी खुलासा करावा अशी मागणी चक्रवर्ती यांनी आयोगाकडे केली आहे.