काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा फैसला आज?
By Admin | Updated: January 28, 2017 01:58 IST2017-01-28T01:58:29+5:302017-01-28T01:58:29+5:30
महापालिका निवडणुकीसाठी काँगे्रस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये सुरू असलेली आघाडीची बोलणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा फैसला आज?
पुणे : महापालिका निवडणुकीसाठी काँगे्रस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये सुरू असलेली आघाडीची बोलणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. राष्ट्रवादीने काँग्रेसला ५४ जागा देण्याचा प्रस्ताव दिला आहे, तर काँग्रेसने ६९ जागांची मागणी राष्ट्रवादीकडे केली आहे. दोन्ही पक्षांमध्ये काही प्रभागांमधल्या जागांचा तिढा कायम असून अखेर आघाडी होणार की नाही, याचा फैसला शनिवारी रात्रीपर्यंत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
महापालिकेतील जागावाटपाबाबत शुक्रवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, शहराध्यक्ष वंदना चव्हाण व काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे व प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांच्यात आघाडीच्या चर्चेची दीर्घ फेरी झाली. प्रत्येक प्रभागनिहाय जागांवर चर्चा करण्यात आली. मात्र, काही प्रभागांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचे विद्यमान नगरसेवक असल्याने तिथला तिढा निर्माण झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने अखेर काँग्रेसला ५४ जागा सोडण्याची तयारी दर्शविली आहे. तर, काँग्रेसने ६९ जागा द्याव्यात,
असा प्रस्ताव राष्ट्रवादीकडे दिला आहे. जागांच्या या रस्सीखेचीवर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षांच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत. जागांवर तोडगा काढून आघाडीचा अंतिम फार्म्युला निश्चित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. तीमध्ये आघाडी करण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांवर विचार करण्यात येत आहे. काँग्रेस पक्षाच्या पार्लमेंटरी कमिटी बोर्डाची बैठक शुक्रवारी मुंबईत झाली. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी रमेश बागवे व विश्वजित कदम हे मुंबईला गेले होते.
भाजपा व शिवसेना यांच्यातील युती तुटल्याने आता काँग्रेस व राष्ट्रवादीनेही स्वतंत्रपणे पालिकेची निवडणूक लढवावी, असा एक मतप्रवाह व्यक्त केला जात आहे. त्याच वेळी दोन्ही पक्षांतील काही नेते आघाडीसाठी आग्रही असल्याचे दिसून येत आहे. शनिवारी रात्रीपर्यंत आघाडी होणार की नाही, याचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
(प्रतिनिधी)