‘बाह्यवळणा’वर संघर्ष!
By Admin | Updated: August 22, 2015 02:04 IST2015-08-22T02:04:18+5:302015-08-22T02:04:18+5:30
मंचर, राजगुरुनगर, कळंब, आळेफाटा, नारायणगाव येथील शेतकऱ्यांचा खेड - सिन्नर बाह्यवळणाला असलेला विरोध झुगारून भूसंपादन करण्याचा पवित्रा आता प्रशासनाने घेतला आहे

‘बाह्यवळणा’वर संघर्ष!
मंचर, राजगुरुनगर, कळंब, आळेफाटा, नारायणगाव येथील शेतकऱ्यांचा खेड - सिन्नर बाह्यवळणाला असलेला विरोध झुगारून भूसंपादन करण्याचा पवित्रा आता प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे येथील शेतकरी संतप्त झाले असून, शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या राजमार्ग प्राधिकरणाला एक इंचही जागेचा ताबा घेऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे. आमच्या मागणीकडे लक्ष न दिल्यास आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा नारायणगाव येथील सर्व बाधित शेतकऱ्यांनी दिला आहे़ दरम्यान, भूमापन विभागाने मोजणी करणार असल्याच्या नोटिसा बजावल्याने शेतकरी व भूसंपादन करणारे विविध विभाग यांच्यात संघर्ष होणार, हे स्पष्ट झाले आहे़
राजगुरुनगर : पुणे-नाशिक महामार्गाच्या राजगुरुनगर बाह्यवळण रस्त्याच्या जमीन संपादनासाठी शासनाला तिसऱ्यांदा राजपत्र प्रसिद्ध करावे लागले असूनही, त्यापासून काहीही बोध न घेता अजूनही शासन शेतकऱ्यांना विश्वासात घेत नाही. राजपत्रावर दिलेल्या हरकतींवर
रीतसर सुनावणी करण्यासाठी त्यांना पाचारण करीत नसल्याने त्यांच्यामध्ये असंतोष आहे.
शासनाने ११ जुलै
रोजी राजपत्राद्वारे अधिसूचना प्रसिद्ध केली. याबाबत निघालेली ही तिसरी अधिसूचना आहे. यापूर्वी
दोनदा अधिसूचना प्रसिद्ध झाली होती; परंतु लोकांच्या विरोधामुळे शासन दोन्ही वेळा वेळेत संपादन प्रक्रिया राबवू शकले नाही.
म्हणून पुन्हा अधिसूचना काढावी लागली आहे.
अधिसूचना नावाला काढली जाते. लोकांच्या हरकतींवर सुनावणीचा फार्स केला जातो आणि जमीनमोजणीची कार्यवाही सुरू केली जाते. आपल्याला दडपून भूसंपादन करण्याची भूमिका शासन घेत असल्याचा शेतकऱ्यांचा समज दृढ झाल्यामुळे यातून तडजोडीचा मार्ग निघत नसल्याचे आतापर्यंत दिसत आले आहे.
राजपत्र प्रसिद्ध झाल्यानंतर २१ दिवसांच्या आत हरकती द्याव्यात, असे शासनाने प्रसिद्ध केले होते. त्याप्रमाणे हरकती देऊनही आतापर्यंत सुनावणीसाठी शेतकऱ्यांना पाचारण केलेले नाही. आपल्या हरकती विचारात न घेता पुन्हा थेट मोजणीला सुरुवात करणार, अशी भीती शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे ते याही वेळी विरोधाच्याच पवित्र्यात आहेत. मोजणीला अथवा कुठल्याही भूसंपादनाच्या प्रक्रियेला आमचा विरोधच आहे, असे सांगत आहेत. आम्हाला बाह्यवळण नको असून, जमिनीच द्यायच्या नाहीत, या जुन्या भूमिकेवर ते ठाम असल्याने बाह्यवळण होण्याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
नारायणगाव : येथील बाह्यवळणास शेतकऱ्यांचा होत असलेला विरोध लक्षात घेऊन कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने नारायणगाव पोलीस ठाण्याने पुढाकार घेऊन समन्वय बैठक घेतली. या बैठकीत राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, महसूल व भूमापन विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी उपस्थित न राहता प्रतिनिधी पाठवून शेतकऱ्यांच्या मागणीची थट्टा केल्याने बाधित शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.
आमच्या हरकतीची सुनावणी व्हावी, ही प्रमुख मागणी शेतकऱ्यांनी कायम ठेवली आहे़ भूमापन विभागाने बजावलेली नोटीस ही बेकायदेशीर असल्याचे बाधित शेतकऱ्यांचे म्हणणे आहे़अनेक शेतकऱ्यांना चार-पाच दिवस अगोदरच नोटिसा बजावण्यात आल्याने त्यांना न्याय मिळेल की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे़ शेतकऱ्यांना कुठेही न्याय मागता येऊ नये, अशी व्यूहरचना करून शासनाने शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे़, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे़ ही बैठक जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या वेळी नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र थोरात, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे निरीक्षक फैजल, इंजिनिअर एस़ एच़ शेख, नारायणगावचे कामगार तलाठी नितीन चौरे, प्रांत कार्यालयातील प्रतिनिधी पी़ के. जावळे, एस़ एम़ मालुसरे, भूकरमापक के़ डी़ सहाणे, उत्तर पुणे जिल्हा शेतकरी बचाव समितीचे अध्यक्ष डॉ़ सुहास कहाडने, बाळासाहेब पाटे, महेश शिंदे, आशिष वाजगे, सचिन शेलोत, मकरंद पाटे, मंदार पाटे, सतीश पाटे, गुलाबराव घाडगे, सतीश काळे, बाळकृष्ण पाटे, शंकर फुलसुंदर, समीर मेहेत्रे, संतोष निंबाळकर, वैभव वाजगे, बाळासाहेब भरविरकर, भूमकर, प्रवीण पाटे, गिरीश शिंदे, रज्जाक काझी आदी बाधित शेतकरी उपस्थित होते़ (वार्ताहर)