स्पर्धा परीक्षांच्या दुकानदारीने विद्यार्थ्यांची कोंडी
By Admin | Updated: April 15, 2017 03:43 IST2017-04-15T03:43:13+5:302017-04-15T03:43:13+5:30
मोठा अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना चांगले कोचिंग देण्याच्या आमिषाला बळी पाडून त्यांच्याकडून लाखो रूपयांची

स्पर्धा परीक्षांच्या दुकानदारीने विद्यार्थ्यांची कोंडी
- दीपक जाधव, पुणे
मोठा अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना चांगले कोचिंग देण्याच्या आमिषाला बळी पाडून त्यांच्याकडून लाखो रूपयांची फी उकळली जात आहे. अमूक प्रकारे तयारी करून घेऊ, चांगल्या नोटस देऊ अशा भूलथापा देऊन प्रवेश घ्यायला लावला जातो, पण प्रत्यक्षात मात्र त्यांच्या वाटयाला घोर निराशा येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. स्पर्धा परीक्षा क्लासेसच्या फिवर देखील शासनाकडून नियंत्रण आणले जाण्याची आवश्यकता विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यामध्ये दररोज शेकडो विद्यार्थी आपले नशीब अजमावण्यासाठी येतात. स्वत:च्या गुणवत्तेच्या जोरावर चांगली नोकरी, पद आणि प्रतिष्ठा मिळविण्याचे स्पर्धा परीक्षा हे विद्यार्थ्यांसाठी एकमेव साधन उरलेले आहे. पुणे शहरामध्ये किमान ३ लाख विद्यार्थी वेगवेगळया स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग या सुपर क्लास वन, क्लास वन पोस्टसह विविध सरकारी विभागांमध्ये निघणाऱ्या व्दितीय, तृतीय श्रेणीतील नोकऱ्यांच्या स्पर्धा परीक्षांची विद्यार्थी तयारी करतात.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा २००८ नंतर नियमितपणे होण्यास सुरूवात झाली. यानंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा मोठया प्रमाणात वाढला आहे. विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षांकडे वाढलेला कल लक्षात घेऊन त्याचे अनेक क्लोचिंग क्लासेस शहरात उभे राहिले. राज्यसेवा परीक्षांच्या केवळ ७-८ महिन्यांच्या कोर्ससाठी ९० हजार ते १ लाख रूपयांची तर युपीएससीच्या कोचिंगसाठी १ लाख ते सव्वा लाख रूपयांची अवाजवी फि या क्लासेसकडून आकारली जात आहेत. नोटस, पुस्तकांसाठी आणखी वेगळे पैसे घेतले जातात. इतका खर्च करूनही प्रत्यक्षात क्लासमधून योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. मात्र क्लासेसवाल्यांनी एकाचवेळी सर्व फी भरून घेतली असल्याने त्यांना तक्रार करता येत नाही. विद्यार्थ्यांकडून मोठयाप्रमाणात घेतल्या जात असलेल्या या फिच्या जोरावर एका क्लासच्या शहरात व शहराबाहेर अनेक शाखा उभ्या राहत आहेत. त्यांच्या एका शाखेमध्ये दिवसाला ४ ते ५ बॅच घेतल्या जातात. एका बॅचमध्ये किमान १०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. स्पर्धा परीक्षांच्या जंजाळात विद्यार्थ्यांना बुडवून बाहेर काढण्याचे मशीन्स हे क्लास बनत चालले आहेत. क्लासेसकडून भपकेबाजपणा दाखवून अनेक भूलथापा विद्यार्थ्यांना मारल्या जातात, या भपकेबाजपणाला विद्यार्थी बळी पडत असून क्लास लावल्याशिवाय आपण पास होऊ शकणार नाही अशी त्यांची मानसिकता बनत आहे. (प्रतिनिधी)
आर्थिक ओढाताणीने घुसमट
स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्याच्या आकांक्षाने खेडयापाडयातील असंख्य तरूण पुण्यात येतात. क्लास लावल्यानंतच यश मिळते अशी एक मानसिकता तयार झाली आहे.
मोठी ओढाताण करून, अनेकदा छोटया-मोठया नोकऱ्या करून ते क्लासची फि जमा करतात. त्याचबरोबर पुण्यात राहण्याचा वाढता खर्च, प्रचंड स्पर्धा, त्यासाठीचा अभ्यास याचा मेळ त्यांना घालावा लागत असल्याची भावना अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
विद्यार्थींच क्लासचे शिक्षक
- अयशस्वी ठरलेले बनतात मार्गदर्शक
- क्लासची जाहिरात करताना मात्र अमुक प्राध्यापक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असे सांगितले जाते.
- प्रत्यक्षात मात्र त्या शिक्षकांचे कधीतरीच विद्यार्थ्यांना दर्शन होते. स्पर्धा परीक्षांची अनेक दिवसांपासून तयारी करीत असलेले विद्यार्थीच क्लासेसमध्ये शिक्षक नव्याने येणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. त्यामुळे लाखो रूपयांची फि भरून क्लासमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पदरात फारस पडत नाही.