संवादकौशल्याची शिकवणी
By Admin | Updated: February 10, 2017 03:03 IST2017-02-10T03:03:39+5:302017-02-10T03:03:39+5:30
निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. गलोगल्ली प्रचाराचा भडिमार सुरू आहे.विविध माध्यमातून मतदारराजाला जागृत करण्यासाठी प्रचारयंत्रणा राबविली जात आहे.

संवादकौशल्याची शिकवणी
चिंचवड : निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. गलोगल्ली प्रचाराचा भडिमार सुरू आहे.विविध माध्यमातून मतदारराजाला जागृत करण्यासाठी प्रचारयंत्रणा राबविली जात आहे. मात्र उमेदवाराने मतदारांशी कसे बोलावे कोणत्या पद्धतीने आपले विचार मांडावे व बोलताना भाषाशैली कशी असावी, यासाठी उमेदवारांच्या भाषण कला संवादकौशल्याच्या शिकवणी घेतल्या जात आहेत. या साठी अनेक उमेदवार वेळ काढून अशा प्रकारच्या अभ्यासाचे धडे घेत आहेत.
निवडणुका फक्त प्रचारातून जिंकता येत नाहीत, यासाठी उमेदवाराचे राहणीमान व भाषा कैशल्य ही महत्वाचे असते. हा कानमंत्र अनेक राजकीय नेत्यांनी सध्याच्या उमेदवारांना दिला आहे. यासाठी शहरातील अनेक इच्छुक राजकीय क्षेत्रात अभ्यासाचे धडे घेण्यासाठी शिकवणीला जात आहेत. इयत्ता चौथीपासून तर पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेले उमेदवार या अभ्यासात व्यस्त आहेत. या मुळे राजकीय अभ्यासाचे शिक्षण देणाऱ्या व्यक्तींची सध्या चांदी होत आहे.
काही जण वर्षभरापासून तयारी करत आहेत. तर काही जण महिनाभर तर काही जण पंधरा दिवसांच्या शिकवणीला बसले आहेत. अशा प्रकारचे शिक्षण देणाऱ्या काही उच्चशिक्षित व्यक्ती व प्राध्यापक सध्या या कामात व्यस्त आहेत. यासाठी उमेदवारांच्या वेळा निश्चित केल्या आहेत. व्यासपीठावर कसे बोलावे यासाठी माईक हातात देऊन भाषाणाचे विषय दिले जात आहेत. कथाकथन यांचा संदर्भ कसा व केव्हा द्यावा याचे धडे दिले आहेत.
आत्मविश्वास वाढविण्यासाठी कोणती पुस्तके वाचावीत याची माहिती दिली जात आहे. बोलताना चेहऱ्यावरील हावभाव कसे ठेवावे व गमती जमती करत समोर असणाऱ्या व्यक्तीला कसे आकर्षित करावे यासाठी विशेष लक्ष दिले जाते. महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांशी कसा संवाद साधावा, नम्रता दाखवून कोणाला कसा नमस्कार करावा हे सांगितले जात आहे. याचबरोबर आपले कपडे कसे असावेत याचेही शिक्षण दिले जात आहे. अनेक उमेदवार सध्या आपल्या व्यस्त वेळेतून काही वेळ या शिकवणीला देत आहेत.
(वार्ताहर)