संवाद साधा, मन मोकळे करून नकारात्मकता दूर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:13 IST2021-09-06T04:13:30+5:302021-09-06T04:13:30+5:30

डमी ११३८ पुणे : कोरोनाकाळात आरोग्याबरोबरच सामाजिक, आर्थिक, भावनिक स्तरावर बरीच उलथापालथ झाली आहे. मानसिक ताणतणावातून कौटुंबिक, वैयक्तिक कलह ...

Communicate, clear your mind and eliminate negativity | संवाद साधा, मन मोकळे करून नकारात्मकता दूर करा

संवाद साधा, मन मोकळे करून नकारात्मकता दूर करा

डमी ११३८

पुणे : कोरोनाकाळात आरोग्याबरोबरच सामाजिक, आर्थिक, भावनिक स्तरावर बरीच उलथापालथ झाली आहे. मानसिक ताणतणावातून कौटुंबिक, वैयक्तिक कलह वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर नकारात्मकता दूर करण्यासाठी ‘संवाद साधा, मन मोकळे करा’, असाच सल्ला मानसोपचारतज्ज्ञांकडून दिला जात आहे. कोणतीही परिस्थिती कायम राहत नाही. योग्य वैद्यकीय उपचार आणि समुपदेशनातून नैराश्यावर नक्कीच मात करता येते, असेही त्यांनी सांगितले आहे. जवळच्या व्यक्तींशी बोलता येत नसल्यास अनेक स्वयंसेवी संस्थांनी हेल्पलाईनच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला आहे.

आयुष्यातील स्पर्धा जीवघेणी ठरते आहे. ताणतणाव वाढलेले असतानाच कोरोनाचे संकट आले आणि सर्वांच्याच आयुष्यात आमूलाग्र बदल झाले. अनपेक्षित संकटाला तोंड देताना कोणाची नोकरी गेली, व्यवसाय बंद पडले, शिक्षण थांबले, तर कोणी अगदी जवळच्या व्यक्तींना गमावले. यातून अनेकांच्या जीवनात नैराश्याची दरी निर्माण झाली आहे. नैराश्यातून आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याची धक्कादायक उदाहरणेही आजूबाजूला पाहायला मिळत आहेत. मात्र, थोडा संवाद, थोडासा संयम, जवळच्या व्यक्तींची साथ आणि थोडे थांबण्याची तयारी यातून आत्महत्येसारख्या विचारावरही मात करता येऊ शकते, असा सल्ला मानसोपचारतज्ज्ञांनी दिला आहे.

आपले कुटुंब, मित्र-मैत्रिणी, प्रिय व्यक्ती हीच आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती असते. कोणत्याही कुटुंबात संवाद हा महत्त्वाचा दुवा असतो. संवादाची दरी निर्माण झाल्यास मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते. त्यामुळे एकमेकांची सुख-दु:खे समजून घ्या, वाईट परिस्थितीत एकमेकांचा भक्कम आधार व्हा, असे मत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. पंकज साबणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

------------------

असे ओळखा नैराश्य :

* विनाकारण चिडचिड होणे

* एकलकोंडेपणा वाढणे

* वाईट विचार मनात येणे

* अतिझोप किंवा अजिबात झोप न येणे

* भूक न लागणे किंवा सारखी भूक लागणे

* सतत रडू येणे, नकारात्मकता वाढणे

-------------------------

काय आहेत उपाय?

* प्रत्येक प्रश्नाला, समस्येला उत्तर असतेच, यावर विश्वास ठेवा.

* जवळच्या व्यक्तींशी मनमोकळेपणाने बोला.

* योग्य वैद्यकीय उपचार आणि समुपदेशनाचा मार्ग निवडा.

* आवडीच्या कामात, छंदात मन रमवा.

* सकारात्मक व्यक्तींशी गप्पा मारा, सकारात्मक विचार करा.

Web Title: Communicate, clear your mind and eliminate negativity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.