गणेश मंडळे व प्रशासनात समन्वयासाठी समिती
By Admin | Updated: April 6, 2016 01:35 IST2016-04-06T01:35:33+5:302016-04-06T01:35:33+5:30
गणेशोत्सव आला की दरवर्षी गणेश मंडळे आणि प्रशासन यांच्यामध्ये वाद होतात आणि या दोघांमध्ये संघर्ष उभा राहतो. हा संघर्ष संपविण्यासाठी आणि दोघांमध्ये

गणेश मंडळे व प्रशासनात समन्वयासाठी समिती
पुणे : गणेशोत्सव आला की दरवर्षी गणेश मंडळे आणि प्रशासन यांच्यामध्ये वाद होतात आणि या दोघांमध्ये संघर्ष उभा राहतो. हा संघर्ष संपविण्यासाठी आणि दोघांमध्ये समन्वय साधत पुण्याचा गणेशोत्सव जगभरात आदर्श ठरविण्यासाठी समन्वय समिती स्थापण्यात येणार आहे. ज्यामध्ये धर्मादाय आयुक्त कार्यालय, पुणे महापालिका, पोलीस, राज्यप्रशासन यांच्या प्रतिनिधींबरोबर गणेश मंडळाचे पदाधिकारी, सामाजिक व्यक्तींचा यामध्ये समावेश असेल, अशी माहिती धर्मादाय सहआयुक्त शिवकुमार डिगे यांनी दिली.
गणेश मंडळे, प्रशासनाचे अधिकारी यांच्या बैठकीचे केसरीवाड्यात आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी डिगे बोलत होते. या वेळी सहायक पोलीस आयुक्त पी. बी. लोखंडे, उपजिल्हाधिकारी गायकवाड, धर्मादाय सहायक आयुक्त नवनाथ जगताप, नगरसेविका मुक्ता टिळक, कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, दगडूशेठ गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
डिगे म्हणाले, की गणेश मंडळांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यातील बहुतांशी हे प्रशासनाशी निगडित आहेत. ते सोडविण्यासाठी समन्वयाची आवश्यकता असल्याने ही समन्वय समिती स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजचे युग हे ब्रँडिंगचे युग आहे. पुण्यातील गणेशोत्सव जगभरात नावाजलेला आहे. त्याचे ब्रँडिंग होणे गरजेचे आहे. त्यातून रोजगार उपलब्ध होऊ शकतो. तसेच गणेश मंडळांची संख्या कमी करणे आदी उद्देशांसाठीही ही समन्वय समिती स्थापण्यात येणार आहे.
या वेळी विविध गणेश मंडळांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली. त्या वेळी त्यांनी विविध समस्यांचा पाढा वाचला. पराग ठाकूर यांनी कधीही अमलात न येणाऱ्या एक खिडकी योजनेबाबत नाराजी व्यक्त केली. प्रताप परदेशी यांनी सकारात्मक, समाजोपयोगी काम करणाऱ्या मंडळांचा सत्कार करण्याची मागणी केली. भाऊसाहेब करपे यांनी स्पिकरच्या भिंती वाढण्यामागच्या कारणांचा ऊहापोह केला. संदीप मोकाटे यांनी कोथरूडमध्ये स्थापलेल्या नियोजन समितीमुळे प्रश्न कमी झाल्याची माहिती दिली. आनंद सराफ यांनी ध्वनिक्षेपकांच्या वापराऐवजी त्यांच्या उत्पादनावर बंदीची मागणी केली.
पोलिसांची भूमिका विशद करताना लोखंडे म्हणाले, की गणेश मंडळांचा बहुतांशी रोष हा पोलिसांवर असतो. पण पोलीस कायदा राबविण्याचे काम करतात. कोणावरही ऊठसूट खटले दाखल करीत नाहीत. पोलिसांची भूमिका ही नेहमी सहकार्याची आहे आणि पुढेही राहील.
टिळक म्हणाल्या, की मंडळांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्यशासनाने महाराष्ट्र गणेशोत्सव महासंघाची स्थापना केली असून, त्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत.
शेटे म्हणाले, की गेल्या १० वर्षांपासून प्रशासन विरुद्ध गणेश मंडळे अशी स्थिती निर्माण होत आली आहे. हे चित्र बदलण्यासाठी स्थापण्यात येणाऱ्या समन्वय समितीकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे.