कोकाटेंवरील हल्ल्यास ‘जशास तसे उत्तर देणार’
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 02:45 IST2018-08-24T02:45:09+5:302018-08-24T02:45:27+5:30
संभाजी ब्रिगेडचा आक्रमक पवित्रा; हिंदुत्ववादी संघटनांवर बंदी घालण्याची मागणी

कोकाटेंवरील हल्ल्यास ‘जशास तसे उत्तर देणार’
पुणे : इतिहास संशोधक, व्याख्याते श्रीमंत कोकाटे यांना काही हिंदुत्ववादी संघटनांकडून जिवे मारण्याच्या धमकीचे पत्र आले आहे. यापुढील काळात त्यांच्या जिवाला काही बरे-वाईट झाल्यास त्याचे उत्तर विरोधकांना ‘जशास तसे’ दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी आक्रमक भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली आहे. गुरुवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी इशारा दिला. सनातन संस्था व शिवप्रतिष्ठान या संघटनांवर बंदी घालावी, अशी मागणी सरकारकडे या वेळी करण्यात आली.
राज्यातील पुरोगामी संस्था, संघटना यांच्यावर टांगती तलवार असून, सरकार याबाबत दुर्लक्ष करीत आहे. कर्नाटकातील पोलीस महाराष्ट्रात येतात. ते करीत असलेल्या तपासात एका चिठ्ठीत ३६ जणांची नावे सापडतात. ज्यांच्या जिवाला यापुढील काळात धोका आहे. त्यात ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे, इतिहास संशोधक प्रा. मा. म. देशमुख, भारत पाटणकर, माजी न्यायमूर्ती डॉ. बी. जे. कोळसे पाटील आदींची नावे त्या यादीत समाविष्ट असल्याने पुरोगामी महाराष्ट्रातील विचारवंतांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. मराठा समाजाला अद्याप आरक्षण नसल्याने त्यानिमित्ताने काढण्यात येत असलेल्या मोर्चांमुळे राज्यातील वातावरण संवेदनशील आहे. तशातच आता कोकाटेंना देण्यात आलेल्या धमकीने नेमके काय चालले आहे, याचा शोध घेण्याची गरज आहे. विचारांची लढाई ही विचारांनीच लढणार असून, यात कुणी बाधा आणल्यास त्याला उत्तर देण्यात येणार आहे.
दाभोलकर व पानसरे यांच्या हत्येप्रकरणी यापूर्वी जे कार्यकर्ते पकडले ते शिवप्रतिष्ठान व सनातनशी संबंधित होते. या संघटनांवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली. याप्रसंगी राहुल पोकळे, अमोल काटे, अजय भोसले उपस्थित होते.
विचारवंतांना संपविण्याचा डाव
वाढत्या दहशतवादी कारवाया, तपासात मुंबई व औरंगाबाद येथून ताब्यात घेतलेले हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते यामुळे विचारवंतांना संपविण्याचा डाव असल्याचे दिसून येत आहे. संस्कृती व विचारांनीच विविध प्रश्नांवर उत्तरे शोधता येतील. त्याच्या विरोधात जाऊन वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होत आहे.
संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आता कोकाटे यांना संरक्षण देणार असून, यापुढील काळात विकृतीच्या पद्धतीने आमच्याशी संवाद साधणार असेल तर त्यांना ठेचल्याशिवाय राहणार नाही, असेही गायकवाड यांनी सांगितले. या सगळ्या प्रकारात मात्र सरकारकडून कुठल्याही सहकार्याची अपेक्षा नाही. लोकांच्या मनात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.