CM Eknath Shinde On Shiv Sena Bhavan: “विधिमंडळातील कार्यालयानंतर शिवसेना भवन ताब्यात घेणार का?”; CM शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 00:26 IST2023-02-21T00:25:32+5:302023-02-21T00:26:55+5:30
CM Eknath Shinde On Shiv Sena Bhavan: शिंदे गट शिवसेना भवनावर दावा सांगणार असल्याच्या चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सूचक शब्दांत थेट भूमिका मांडली.

CM Eknath Shinde On Shiv Sena Bhavan: “विधिमंडळातील कार्यालयानंतर शिवसेना भवन ताब्यात घेणार का?”; CM शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
Maharashtra Politics: उद्धव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांवर अद्याप अंतिम निर्णय येणे बाकी असताना पक्ष आणि चिन्हाप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल देत ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्यात आले. यानंतर यासंदर्भात मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया येत आहेत. यातच शिंदे गटाने विधिमंडळातील कार्यालय ताब्यात घेतले असून, शिवसेना भवनही ताब्यात घेणार का, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. मात्र, यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे विधान केले आहे.
कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. महाविकास आघाडी आणि भाजपसह शिंदे गटातील अनेक नेते दोन्ही मतदारसंघात जोरदार प्रचार करताना पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील कसबा पेठ मतदारसंघात प्रचारासाठी पोहोचले. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी शिवसेना भवनासंदर्भात सूचक विधान केले.
एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, केले महत्त्वाचे विधान
पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी पुण्यात असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी बोलताना अनेक मुद्द्यांवर थेट भाष्य केले. निवडणूक आयोगाचा निर्णय मेरीटवर झाला आहे. त्यावर आक्षेप घेणे चूक आहे. आम्ही शिवसेना आहोत. त्यामुळेच आम्ही विधीमंडळाचे कार्यालय ताब्यात घेतले. मात्र आम्हाला कोणत्याही मालमत्तेवर, प्रॉपर्टीवर आम्हाला दावा करायचा नाही. आम्हाला त्याची गरज नाही. आम्हाला कोणत्या गोष्टीचा मोह नाही. आम्हाला बाळासाहेबांचे विचार आणि दिघे साहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे त्यामुळे आम्हाला काहीही नको, तुम्हाला कोणीही काहीही सांगितल तरी विश्वास ठेवू नका. अधिकृतपणे सांगतो कोणत्याही संपत्तीवर आमचा दावा नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कसबा पेठेतील अनेक समाजाचे लोक मला येऊन भेटले. कसब्यातील जुन्या वाड्यांचा प्रश्न, वाहतुकीचा प्रश्न असे अनेक प्रश्न त्यांनी मांडले. नाराजी असल्याचे विरोधकांकडून हे पसरवले जात असून हा मतदारसंघ युतीचा बालेकिल्ला आहे. मतदार ठरवत असतात की, कोणाला जिंकवायचे. युती सरकार ज्या धडाडीने निर्णय घेतय त्यामुळे हे सरकार काम करत असल्याचा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"