घरभाडे भत्ता बंद करून वेतनवाढही थांबविणार
By Admin | Updated: December 7, 2015 00:11 IST2015-12-07T00:11:03+5:302015-12-07T00:11:03+5:30
शिरूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, कर्मचारी नियुक्तीच्या ठिकाणी राहत नसल्याने अनेक वेळा रुग्णांच्या जिवावर बेतले आहे.

घरभाडे भत्ता बंद करून वेतनवाढही थांबविणार
कोरेगाव भीमा : शिरूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, कर्मचारी नियुक्तीच्या ठिकाणी राहत नसल्याने अनेक वेळा रुग्णांच्या जिवावर बेतले आहे. त्यामुळे कर्तव्यात कसूर करणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे घरभाडे भत्ता बंद करून वेतनवाढही रोखण्याचा निर्णय घेण्याबरोबरच त्यांच्यावर कारवाईसाठी शासनाकडे पाठपुरावा करू, असा इशारा जिल्हा आरोग्याधिकारी भगवान पवार यांनी दिला आहे.
शासनाच्या सर्व शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांनी नियुक्तीच्या ठिकाणी निवासी राहणे बंधनकारक आहे. मात्र बहुतांश कर्मचारी नियुक्तीच्या ठिकाणी निवासी न राहता आपल्या सोईच्या ठिकाणीच राहतात. यास जिल्हा आरोग्य विभागही अपवाद असेल तर नवलच म्हणावे लागले असते. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांशी व ज्याठिकाणी आपली नियुक्ती आहे तेथील ग्रामसेवक व सरपंचांकडून गावात रहिवासी असल्याचे बोगस दाखले देत शासनाच्या डोळ्यांत धूळ फेकली आहे. या संदर्भात अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे शिरूर तालुका अध्यक्ष सतीश साकोरे यांनी माहिती अधिकारातून माहिती मागितल्यानंतर बोगस दाखल्यांचा हा प्रकार समोर आला आहे. तर तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रसूतीसाठी महिला रुग्ण दाखल होऊनही डॉक्टर आरोग्य केंद्रामध्ये हजर राहात नाहीत. त्यामुळे शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून चांगली आरोग्य सेवा देण्याच्या प्रयत्नाला वैद्यकीय अधिकाऱ्यांकडूनच खो घालण्याचा प्रकार घडत आहे.
यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार यांच्याशी संपर्क साधला असता, ‘डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी निवासी राहणे बंधनकारक आहे. जे डॉक्टर व कर्मचारी निवासी राहणार नाहीत, त्यांचे घरभाडे भत्ता बंद करून वेतनवाढ थांबवू,’ असे सांगितले व ज्यांनी बोगस रहिवासी दाखले दिले असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. (वार्ताहर)