दहा साखर कारखान्यांची धुराडी बंद
By Admin | Updated: February 12, 2017 04:38 IST2017-02-12T04:38:46+5:302017-02-12T04:38:46+5:30
जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांपैकी १० कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. दर वर्षी एप्रिल महिन्यात बंद होणाऱ्या साखर कारखान्याने चालू वर्षी उसाअभावी जानेवारी

दहा साखर कारखान्यांची धुराडी बंद
सोमेश्वरनगर : जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांपैकी १० कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. दर वर्षी एप्रिल महिन्यात बंद होणाऱ्या साखर कारखान्याने चालू वर्षी उसाअभावी जानेवारी महिन्यातच बंद करावे लागले आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यातील कारखान्यांनी मिळून ४५ लाख ६६ हजार मे.टन उसाचे गाळप करून ४९ लाख ८१ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.
जिल्ह्यातील घोडगंगा, दौंड शुगर, कर्मयोगी, नीरा भीमा, व्यंकटेश्वर शुगर, अनुराज शुगर, श्रीनाथ म्हस्कोबा, बारामती अॅग्रो, छत्रपती आणि राजगड या साखर कारखान्यांनी आपल्या गाळप हंगामाची सांगता करत कारखान्यांची धुराडी बंद केली आहेत. तर चालू हंगामात भीमा पाटस कारखाना बंद होता. चालू गळीत हंगामात राज्यातील सर्वच साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील उसाचे क्षेत्र घटल्याचे चित्र होते.जास्तीत जास्त ऊस मिळविण्यासाठी अनेक कारखान्यांनी एकमेकांच्या कार्यक्षेत्रात घुसखोरी करत त्याच ठिकाणी तंबू ठोकले होते. तर ऊसउत्पादकांना जादा पैशांचे आमिष दाखवून ऊस मिळविण्यासाठी संचालक मंडळ, शेतकी विभागाने रात्रंदिवस धडपड केली. कारखाने सुरू झाल्यापासून संचालक मंडळ शेतकी विभागांना हताशी धरून बैठक घेत असून रोजची रणनीती आखत आहे.
कारखान्यांनी बाहेरील गेटकेन ऊस कसा आपल्या कारखान्यांला जास्तीत जास्त मिळवता येईल, याकडे कारखान्यांचे लक्ष लागले आहे. ऊसाचे घटलेले क्षेत्र आणि साखरेला असलेला चांगला भाव याकडे जादा गाळप करण्यासाठी कारखाने धडपडत होते. चालू हंगामात जो कारखाना जादा ऊसाचे गाळप करणार त्या कारखान्याला अधिक नफा होणार त्यामुळे जवळपास सर्वच साखर कारखान्यांनी आपल्या जवळील साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात घुसखोरी केली होती. अनेक कारखान्यांनी जागेवरच ‘काटा पेमेंट’ देण्याचे चालू केले आहे. गेल्या हंगामात ऊसउत्पादकांना दोन टप्यात एफआरपी देणारे कारखाना या वर्षी एकरकमी एका टनाला २८०० ते ३ हजार रूपये रोखीने ऊसउत्पादकांना मोजले. तसेच चालू हंगामात थंडीचे प्रमाण चांगले असल्याने ऊसाचा गोडवा वाढला होता.
जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांचे ‘डे’ चे साखर उतारा सव्वा बारावर गेले आहेत. सर्व मिळून ४५ लाख ६६ हजार २९७ में. टन ऊसाचे गाळप करून ४९ लाख ८१ हजार २८३ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.
नोव्हेंबर ते जानेवारी या दरम्यान समजल्या जाणाऱ्या ‘हाय रीकव्हरी पिरेड’ मध्ये जिल्ह्यातील अनेक कारखाने साखर उताऱ्यात अकरा ते साडे अकरा टककयांवर पोहचले.सध्या सोमेश्वर, माळेगाव, विघ्नहर, भिमाशंकर, संत तुकाराम या पाच कारखान्यांचेच गाळप सुरू आहे.
सोमेश्वरने मारली बाजी...
सरासरी साखर उताऱ्यातही ११.५२ टक्क्यांचा उतारा ठेवत सोमेश्वरने बाजी मारली आहे. ११.३१ टक्केचा साखर उतारा ठेवत विघ्नहर कारखान्याने दुसरा, तर माळेगाव कारखान्याने ११.२४ टक्के साखर उतारा ठेवत तिसरा क्रमांक पटकाविला आहे.