चाकण : येथील चाकण नगर परिषदेच्या सफाई कामगाराचा मानसिक छळ करत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नगरपरिषदेच्या तीन कामगारांसह एकूण नऊ जणांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुलगा अविनाश अनिल धोत्रे ( वय २२, रा. खंडोबा माळ, चाकण ) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.२० जून) सकाळी सहा वाजता अनिल चिमाजी धोत्रे (वय ४६, रा. खंडोबा माळ, चाकण) या सफाई कामगाराचा वायसीएम रुग्णालयात उपचार चालू असताना मृत्यू झाला. त्यांची पत्नी शांताबाई अनिल धोत्रे यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती देखील चिंताजनक आहे. याप्रकरणी चाकण नगरपरिषदेचे कर्मचारी विजय भोसले, मंगल गायकवाड, संगीता घोगरे ( सर्व रा. आंबेडकरनगर, चाकण ) तसेच फियादीची पत्नी कोमल, सासरे शाम बाबू मंजुळे, सासू सुनीता, चुलत सासरे रमेश बाबू मंजुळे, चुलत सासू छाया, मेव्हणा राजू ( सर्व रा. पनवेल, जि.रायगड ) या नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धोत्रे दांपत्याने १२ जून रोजी नगर परिषदेतील मानसिक छळाला कंटाळून विषारी औषध प्राशन केले होते. पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, शांताबाई व अनिल हे दोघे चाकण नगर परिषदेत सफाई कामगार म्हणून कामाला होते. फिर्यादी अविनाशचे २०१६मध्ये पनवेल येथील कोमल हिच्याशी लग्न झाले होते. लग्नानंतर दोनच महिन्यात कोमलने घरात सतत भांडण करून शिवीगाळ करून माहेरी निघून गेली. वकिलामार्फत नोटीस पाठवत दहा लाखांच्या पोटगीची मागणी मुलगा अविनाशच्या सासरच्या लोकांकडून करण्यात आली होती. त्यांनी मागितलेल्या भरपाईमुळे धोत्रे दांपत्य कायम तणावाखाली होते.त्यातच चाकण नगर परिषदेत काम करीत असलेल्या ठिकाणी मुकादम विजय भोसले, मंगल गायकवाड हे नेहमी कामगारांसमोर अपमानास्पद वागणूक देत होते. काम नीट करीत नसलेबाबत त्यांना दोन नोटीसही दिल्या होत्या. तर विजय भोसले याने अविनाशच्या आई-वडिलांचे पगार थांबवले होते. त्यामुळे होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून या दांपत्याने विषारी औषध प्राशन केले. पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रशांत पवार पुढील तपास करत आहेत.
विषारी औषध प्राशन केलेल्या चाकण नगरपरिषदेतील सफाई कामगार दांपत्यापैकी पतीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 13:16 IST
कुटुंब आणि नगर परिषद कार्यालयात होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून धोत्रे दांपत्याने १२ जून रोजी विषारी औषध प्राशन केले होते.
विषारी औषध प्राशन केलेल्या चाकण नगरपरिषदेतील सफाई कामगार दांपत्यापैकी पतीचा मृत्यू
ठळक मुद्देआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चाकण नगर परिषदेच्या तीन कामगारांसह नऊ जणांवर गुन्हा दाखल