निर्मल आणि आरोग्यदायी वारी़
By Admin | Updated: June 25, 2016 00:24 IST2016-06-25T00:24:25+5:302016-06-25T00:24:25+5:30
पालखी सोहळ्यासाठी राज्यभरातून वारकरी आळंदी व देहूत जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आळंदी व देहूतून मुक्काम उरकल्यानंतर दोन दिवस पुण्यात थांबल्यानंतर जिल्ह्यात

निर्मल आणि आरोग्यदायी वारी़
पुणे : पालखी सोहळ्यासाठी राज्यभरातून वारकरी आळंदी व देहूत जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आळंदी व देहूतून मुक्काम उरकल्यानंतर दोन दिवस पुण्यात थांबल्यानंतर जिल्ह्यात जागोजागी मुक्काम व विसावा होणार आहे. ही वारी निर्मल व आरोग्यदायी होण्यासाठी जिल्हा परिषदने तयारी केली आहे. सोयी-सुविधांसाठी ४0 लाखांचा निधी देणार असून, दोन्ही पालखीच्या मुक्कामी गावास ३ लाख व विसावा गावास ५0 हजार, तर संत सोपानकाका पालखी मुक्कामी गावास ७५ हजार व विसावा गावास २५ हजार दिले जाणार आहेत.
७५ टँकरने पाणी : श्री संत ज्ञानेश्वरमहाराज पालखीसमवेत ४0, तर श्री संत तुकाराममहाराज पालखीसमवेत ३५ अशा एकूण ७५ टँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे. पाणीपुरवठा ठिकाणी क्लोरोस्कोप, टीसीएल पावडर, मार्गावरील सर्व पाणीस्रोतांची तपासणी करून पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.
८00 शौचालये : पालखीकाळात वारकऱ्यांना शौचालयांची मोठी गैरसोय होत असते. यामुळे पालखी प्रस्थानापासून ते वाखरीपर्यंत १६ दिवस माऊलींच्या पालखीत प्रत्येक ठिकाणी ५00, तर तुकारामांच्या वारीत प्रत्येक ठिकाणी ३00 अशी ८00 फिरती शौचालये राहणार आहेत. यासाठी २ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी पथके
वारकऱ्यांच्या सेवेसाठी परिषदेचा आरोग्य विभागही सज्ज झाला आहे. दोन्ही पालखी मार्गावर आरोग्य पथके रुग्णवाहिकेसह तैनात करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्याधिकारी डॉ. भगवान पवार यांनी सांगितले. प्रत्येक दिंडीप्रमुखास एक औषध किट देण्यात येणार आहे. त्यात सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, डोकेदुखी, जुलाब यावरची औैषधं असणार आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून आरोग्य विभागाची तयारी सुरू असून, त्यांना आराखडा तयार केला आहे.
पालखी मार्गावरील सर्व पाणीस्रोतांची जैविक तपासणी करण्यात आली आहे. दूषित असलेल्या स्रोतांचे पुन्हा शद्धीकरण करून ते पाणी नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. पुन्हा नमुना दूषित असलेल्या ठिकाणी ‘हे पाणी पिण्यास अयोग्य आहे,’ असा फलक लावण्यात आलेला आहे. पालखी मार्गक्रमण मार्गावर काळात एक कर्मचारी नियुक्त करण्यात आलेला आहे. टँकर भरण्याची ठिकाणेही निश्चित करण्यात आली आहेत.असे असणार पथक
या पथकात एक रुग्णवाहिका असून,
१ आरोग्याधिकारी,
१ औैषध निर्माण अधिकारी, १ नर्स व एक ड्रायव्हर.
१७ प्रकारची औैषधे उपलब्ध असणार आहेत. तसेच बाह्यरुग्ण तपासणीची व्यवस्थाही उपलब्ध असून, मलमपट्टीची सोयही करण्यात येणार आहे.
मुक्कामासाठी ग्रामपंचायती सज्ज
पालखीतळावरील जमिनीचे सपाटीकरण करणे, स्वच्छता करणे, स्वच्छतागृहांची व्यवस्था करणे, फिरते शौचालये उपलब्ध करून देणे, तळावरील गटार, नालेसफाई, जंतुनाशकाची फवारणी करण्यात येणार आहे.
‘स्वच्छ वारी सुंदर वारी’
पुणे जिल्हा परिषद यंदा ‘स्वच्छ वारी सुंदर वारी’ हा संदेश घेऊन संत ज्ञानेश्वर व संत तुकारामांच्या वारीत आपली ‘स्वच्छतेची वारी’ घेऊन जाणार आहे. यात १०० स्वयंसेवक सहभागी होणार असून, ते वारीपूर्व व वारीनंतर मुक्कामी गावात स्वच्छता करणार आहेत.