शहरातील निर्बंध आणखी कडक करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:12 IST2021-04-20T04:12:38+5:302021-04-20T04:12:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील कोरोना प्रादुर्भाव कमी होत नसताना नागरिकदेखील विनाकारण रस्त्यावर गर्दी करताना दिसत आहे. रस्त्यावरील ...

शहरातील निर्बंध आणखी कडक करणार
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील कोरोना प्रादुर्भाव कमी होत नसताना नागरिकदेखील विनाकारण रस्त्यावर गर्दी करताना दिसत आहे. रस्त्यावरील गर्दी कमी झाली नाही तर आणखी कडक निर्बंध करण्यात येणार असून कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला आहे. त्याच वेळी मार्केट यार्डमधील दररोज ५० टक्के गाळे सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शहरातील गर्दीची ठिकाणे असलेल्या एसटी बसस्थानक, रेल्वे स्थानक, मार्केट यार्ड परिसरात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज स्वत: भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी जमावबंदीच्या काळात दिवसा रस्त्यावरील गर्दी कमी झाली नाही तर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
शहरात सायंकाळी ६ नंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सायंकाळनंतर नागरिक घराबाहेर पडत नाही. मात्र, त्याच वेळी दिवसभर नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे. असंख्य नागरिक विनाकारण लहान मुलांसह फिरताना दिसत आहे. त्यामुळे संसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्या लोकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचे गुप्ता यांनी सांगितले.
सर्व पोलिसांच्या चाचण्या करणार
शहर पोलीस दलात कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले आहे. दररोज १२ ते १५ पोलिसांना कोरोनाची लागण होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरातील सर्व पोलिसांच्या चाचण्या करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मार्केटयार्ड ५० टक्के क्षमतेने सुरु राहणार
सोमवारी पोलीस अधिकारी, व्यापारी, वाहतूकदार, बाजार समिती यांच्या बैठक झाली. त्यात गुलटेकडी बाजारातील दररोज एका बाजूचे गाळे एकाआड एक दिवस सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. २१ एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे मार्केट यार्डातील एकूण गाळ्यांपैकी दररोज फक्त ५० टक्के गाळे सुरु राहणार आहेत. तेथे फक्त घाऊक विक्री करण्यात येणार असून किरकोळ विक्री होणार नाही. तसेच शनिवार व रविवारी बाजार बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळेही जर बाजारातील गर्दी कमी झाली नाही तर बाजार बंद ठेवण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.