शहरात वावरताहेत तडीपार गुंड

By Admin | Updated: February 7, 2017 03:09 IST2017-02-07T03:09:57+5:302017-02-07T03:09:57+5:30

महापालिका निवडणुकीमुळे पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. रेकॉर्डवरील १७० गुन्हेगारांवर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

In the city, there is a racket racket | शहरात वावरताहेत तडीपार गुंड

शहरात वावरताहेत तडीपार गुंड

पिंपरी : महापालिका निवडणुकीमुळे पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. रेकॉर्डवरील १७० गुन्हेगारांवर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. डिसेंबर २०१६ पर्यंत तब्बल ३० गुन्हेगारांना शहरातून तडीपार करण्यात आले आहे. तडिपारी आदेशाचा भंग करून शहरात वावरताना आढळून आलेल्या ८ गुंडांवर कारवाई केली आहे. आणखी २५ जणांवर कारवाई प्रस्तावित आहे. झोपडपट्टी दादा प्रतिबंधात्मक (एमपीडीए) कायद्यानुसार आतापर्यंत पाच जणांवर कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती परिमंडळ तीनच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी निवडणुकीच्या निमित्ताने मागील महिन्यात पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. विविध पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात गंभीर गुन्हे दाखल असलेल्यांसह संशयित गुन्हेगारांवर प्रतिबंध कारवाई करण्याचे आदेश दिले होते. महापालिका निवडणूक २१ फेब्रुवारीला होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाले. छाननी झाली. प्रचार सुरू झाला आहे, परिमंडळ तीनच्या हद्दीतील पिंपरी, भोसरी, निगडी, चिंचवड, एमआयडीसी, सांगवी, वाकड, हिंजवडी आणि चतु:शृंगी या नऊ पोलीस ठाण्यांमधील दाखल गुन्ह्यांचे वर्गीकरण करण्यात आले. तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे. गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेऊन विविध कलमानुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येते. प्रतिबंधात्मक कारवाईचे पाऊल उचलून सहा महिन्यांपासून ते दोन वर्षे कालावधीपर्यंत सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार करणे, महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंधात्मक (एमपीडीए) कायद्यानुसार कारवाई करणे, सीआरपीसी कायद्यानुसार कारवाई केली जाते. डिसेंबर २०१६पर्यत वर्षभरात १७० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या दोन सराईत गुंडांना खंडणीविरोधी पथकाने थेरगावातून अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आली. संतोष खलसे (वय २७, रा. थेरगाव), संदेश लाजरस चोपडे (वय २८, रा. काळेवाडी) अशी त्यांची नावे आहेत. परदेशी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या एका तरुणास पिंपरी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून १ पिस्तूल आणि ३ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. (प्रतिनिधी)



पोलीस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज
१रमाबाई नगर येथील सराईत गुन्हेगार अरविंद नागनाथ साबळे (वय ३८) याच्यावर झोपडीपट्टीदादा कायद्याअंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली होती. त्याची रवानगी कोल्हापूर, कळंबा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली असताना, त्याने महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक १९ अ मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दोन वर्षांसाठी तडीपारी केली असताना देखील, कायद्याचे उल्लघंन करून राजरोसपणे वावरणाऱ्या अनेक तडीपार गुंडांवर पोलिसांनी कारवाई केली.
२भोसरीतील शिवदास शंकर गायकवाड (वय ३१,रा.शांतीनगर झोपडपट्टी,भोसरी) या गुंडासह एक आणि दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपारीची कारवाई करण्यात आलेल्या गुंडांपैकी काही जण राजरोसपणे वावरत असताना आढळून आले. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये ज्ञानेश्वर त्रिंबक नलावडे (वय २३, बालाजीनगर ), नितीन सदाशिव वाघमारे, समाधान माणिक मोरे (वय २०, भोसरी) , वाकड, हिंजवडी, खडकी या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेला तडीपार गुंड विशाल शहाजी कसबे (वय २०, रा. काळाखडक) याचा समावेश आहे.


काही आरोपींना पोलिसांनी केले जेरबंद
१गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने चंदन सुरेंद्र सिंग (वय २८, गणेशनगर,थेरगाव) या आरोपीस बेकायदापणे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे अटक केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली. बेकायदा पिस्तूल बाळगणारे, तसेच पिस्तूल विक्री करणारे अशा काही आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे.
२परदेशी बनावटीचे बेकायदा पिस्तूल बाळगलेल्या मुकेश ओमप्रकाश मंगोत्रा (वय २६, रा. संत तुकारामनगर) या तरुणास पोलिसांनी अटक केली त्याला पिस्तूल, तसेच जिवंत काडतुसे या मुद्देमालासह ताब्यात घेतले. चेतन विश्वकर्मा याच्याकडून पिस्तूल विकत घेतल्याचे सांगितल्यामुळे पोलिसांनी विश्वकर्मा याच्यावरसुद्धा गुन्हा दाखल केला आहे. बेकायदा गावठी कट्टा बाळगणाऱ्या एकाला निगडी पोलिसांनी जेरबंद केले. तुळशीराम नथुराम पोकळे (वय ३०, काळेवाडी) या आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गावठी कट्टा जप्त करण्यात आला.

Web Title: In the city, there is a racket racket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.