निष्काळजीमुळे शहरच ‘गॅस’वर

By Admin | Updated: February 12, 2016 03:39 IST2016-02-12T03:39:29+5:302016-02-12T03:39:29+5:30

शहरामध्ये गॅसपाइपलाइन टाकलेल्या ठिकाणी योग्य ती खबरदारी न घेता निष्काळजीपणे खोदाई होत असल्यामुळे गॅसपाइपलाइनला धक्का लागून गॅसगळती होण्याच्या घटना वारंवार

The city on 'gas' due to negligence | निष्काळजीमुळे शहरच ‘गॅस’वर

निष्काळजीमुळे शहरच ‘गॅस’वर

पुणे : शहरामध्ये गॅसपाइपलाइन टाकलेल्या ठिकाणी योग्य ती खबरदारी न घेता निष्काळजीपणे खोदाई होत असल्यामुळे गॅसपाइपलाइनला धक्का लागून गॅसगळती होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. अग्निशमन दल व गॅस कंपनीचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचून गॅसगळती रोखत असले, तरी या चुकांमध्ये सुधारणा न झाल्यास गॅसपाइपलाइनच्या मोठ्या स्फोटाला शहरातील नागरिकांना सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

मॉडेल कॉलनीमधील कॅनॉल रस्त्याजवळ रस्त्याचे काम सुरू असताना गॅसपाइपलाइनला धक्का लागून गुरुवारी गॅसगळती सुरू झाली. त्यानंतर अग्निशमन दल व एमएनजीएल कंपनीच्या पथकाने येऊन गॅसगळती रोखली. गेल्या काही दिवसांपासून मॉडेल कॉलनीमध्ये गॅसपाइपलाइन फुटून गॅसगळती होण्याचे प्रकार सतत घडत आहेत. गॅसपाइलाइनबाबत कडक निर्देश ठरवून दिले असतानाही या घटना घडत असल्याने त्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गॅसगळती सुरू झाल्यानंतर चुकूनही आगीशी संपर्क झाला, मोबाइल बोलणे, स्विच आॅन-आॅफ होणे अशा कृतीतून स्पार्क झाला, तर मोठ्या दुर्घटनेला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) या कंपनीकडून मॉडेल कॉलनी परिसरामध्ये गॅसपाइपलाइन टाकण्यात आली आहे. घरांना पाइपलाइनमधून गॅसचा पुरवठा केला जात आहे. गॅसपाइपलाइन टाकण्याचे निकष ठरवून देण्यात आले आहेत. रस्त्यापासून किमान एक मीटर खोल गॅसपाइपलाइन टाकणे बंधनकारक आहे. गॅस पाइपलाइनच्यावर वॉर्निंग मॅट टाकली जाणे आवश्यक असते. त्याचबरोबर पाइपलाइन गेलेल्या जागेवर गॅसपाइपलाइन गेल्याच्या खुणेचे दगड लावणेही बंधनकारक आहे. संबंधित ठिकाणी खोदाई करताना एमएनजीएलच्या अधिकाऱ्यांना त्याची पूर्वकल्पना देणे आवश्यक आहे. गॅसपाइपलाइनला धक्का पोहोचू नये म्हणून इतक्या प्रकारची खबरदारी घेण्यात आली आहे. मात्र, तरीही गॅसपाइपलाइनच्या ठिकाणी खोदाई करताना धक्का पोहोचून वारंवार गॅसगळती होण्याच्या घटना घडत आहेत.
अग्निशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी सांगितले, की गॅसगळतीचा कॉल आल्यानंतर आम्ही तातडीने घटनास्थळी धाव घेऊन कूलिंगचे काम सुरू करतो. मात्र, गॅस कंपनीचे पथक आल्याशिवाय गॅसगळती थांबविता येत नाही. त्याकरिता त्या पाइपलाइनमधून होणारा गॅसपुरवठा थांबविणे आवश्यक असते. संबंधित कंपन्यांनी ठरलेल्या निकषाप्रमाणे गॅसपाइपलाइन रस्त्यापासून खोलवर टाकणे आवश्यक आहे.
गॅसपाइपलाइनच्या ठिकाणी खोदाई करताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून योग्य ती खबरदारी न घेतली गेल्यामुळे या घटना घडत असल्याचा आरोप स्थानिक नगरसेवक राजू पवार यांनी केला आहे.

समन्वयाचा अभाव
गॅसपाइपलाइनच्या ठिकाणी रस्ता, ड्रेनेजलाइन व इतर कारणांसाठी खोदाई करावयाची असल्यास एमएनजीएल कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्याची माहिती देऊन ती करणे आवश्यक आहे. मात्र, प्रत्यक्षात महापालिकेकडून एमएनजीएल कंपनीशी समन्वय न साधताच कामे केली जात असल्याने गॅसगळतीच्या घटनांना सामोरे जावे लागत आहे. गॅसपाइपलाइनच्या ठिकाणी जेसीबीने खोदाई करण्याऐवजी ती कामगारांमार्फत काळजीपूर्वक खोदाईची कामे केली जाणे आवश्यक आहे.

जीव धोक्यात घालून रोखावी लागते दुर्घटना
अग्निशमन दलास गॅसगळतीचा कॉल आल्यानंतर त्यांचे जवान तातडीने घटनास्थळी धाव घेतात. घटनास्थळापासून नागरिकांना दूर जाण्याचे आवाहन करून, तसेच वाहतूक थांबवून कूलिंगचे काम त्यांच्याकडून केले जाते. मात्र, गॅसपाइपलाइनचा पुरवठा बंद करून त्याची दुरूस्ती करण्याचे काम एमएनजीएलचे पथक आल्याशिवाय करता येत नाही. त्यामुळे एमएनजीएलचे पथक येईपर्यंत अग्निशमन दलाच्या जवानांना जीव धोक्यात घालून घटनास्थळी कूलिंगचे काम करीत थांबून राहावे लागते.

२०० किमीचे काम पूर्ण, १ हजार किमी प्रस्तावित
शहरामध्ये एमएनजीएलकडून गॅसपाइपलाइन टाकण्याचे २०० किमी पर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. आणखी एक हजार किमीपर्यंतची गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम प्रस्तावित आहे. एवढ्या मोठ्याप्रमाणात गॅसपाइपलाइनचे जाळे शहरात निर्माण झाल्यानंतर खूपच सावधगिरीने खोदाईची कामे करावी लागणार आहेत. शहरात निष्काळजीपणाने खोदाईची कामे केली जात असल्याने धोका होण्याची शक्यता आहे. असे असताना आणखी १ हजार किमी गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम प्रस्तावित आहे.

पाइपलाइन चुकून फुटली
गॅसपाइपलाइन असलेल्या ठिकाणी खोदाई करताना महापालिका प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेतली जाते. मॉडेल कॉलनीमध्ये रस्त्याचे काम सुरू असताना चुकून गॅसपाइपलाइनला धक्का लागून गळती सुरू झाली.’
- राजेंद्र राऊत, पथ विभागप्रमुख

Web Title: The city on 'gas' due to negligence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.