बीआरटीविरोधात नागरिक आंदोलनाच्या तयारीत
By Admin | Updated: September 1, 2015 04:11 IST2015-09-01T04:11:00+5:302015-09-01T04:11:00+5:30
विश्रांतवाडी ते संगमवाडी बीआरटी मार्गावरील समस्यांचे निवारण न करताच या मार्गावर बसमधून प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आल्याने नागरिकांना अनेक अडचणी व प्रचंड

बीआरटीविरोधात नागरिक आंदोलनाच्या तयारीत
येरवडा : विश्रांतवाडी ते संगमवाडी बीआरटी मार्गावरील समस्यांचे निवारण न करताच या मार्गावर बसमधून प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आल्याने नागरिकांना अनेक अडचणी व प्रचंड वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या विरोधात नागरिक आंदोलनाच्या तयारीत आहेत़
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विश्रांतवाडी ते संगमवाडी बीआरटी मार्गाचे रविवारी (दि.३०) उद्घाटन केले. त्या वेळी पवार यांनी वाहतूक सुरळीत करण्याबाबत प्रशासनाला अनेक सूचनाही केल्या. त्यापूर्वी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी भेट देऊन बीआरटीची पाहणी केली होती. त्या वेळी स्थानिक नगरसेवक व नागरिकांनी बीआरटीबाबत सांगितलेल्या अडचणी सोडवण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले होते. मात्र, या समस्यांचे निवारण न करताच पालिकेने उद्घाटन करून प्रवासी वाहतूक सुरू केली. यासाठी नागरिकांच्या अडचणी सोडवण्याबाबत सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात आले.
बीआरटी मार्गात अनेक ठिकाणी पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी सोय करण्यात न आल्याने ज्येष्ठ नागरिक व अपंगांना लांबवर चालण्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
प्रतीकनगर कॉर्नरवर वाहनांना रस्ता ओलांडण्याची सोय न केल्याने सर्व वाहनांना विश्रांतवाडी चौकातून वळून यावे लागत आहे. त्यामुळे वाहनांना लांबवर जावे लागत आहेच़ पण यामुळे विश्रांतवाडी चौकात प्रचंड वाहतूककोंडी होताना
दिसते.
याबरोबरच बीआरटीमुळे इतरही समस्या निर्माण झाल्या आहेत. पालिकेने या समस्यांकडे गांभीर्याने पाहणे जरुरीचे आहे, मात्र तसे होताना दिसत नाही. या आठवडाभरात बीआरटीमुळे निर्माण झालेल्या समस्यांचे निवारण न झाल्यास पालिकेविरोधात आंदोलन करणार असल्याचे राष्ट्रवादीचे विनोद पवार यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)