भाजप-राष्ट्रवादीत चूरस
By Admin | Updated: February 22, 2017 03:37 IST2017-02-22T03:37:17+5:302017-02-22T03:37:17+5:30
महापालिकेच्या ४१ प्रभागातील नगरसेवकपदाच्या १६२ जागांचे भवितव्य मंगळवारी मतदान यंत्रात बंदिस्त झाले

भाजप-राष्ट्रवादीत चूरस
पुणे : महापालिकेच्या ४१ प्रभागातील नगरसेवकपदाच्या १६२ जागांचे भवितव्य मंगळवारी मतदान यंत्रात बंदिस्त झाले. आता पालिकेवर सत्ता कोणाची हा सर्वाधिक चर्चेचा विषय झाला आहे. भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादीतच चूरस होईल असा असल्याचे दिसते आहे. भाजपाला शिवसेनेची व राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसची भक्कम मदत तरी होईल का असा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मनसेही निर्णायक ठरतील अशी चर्चा सुरू झाली आहे.
मतदारसंघांची मोठ्या प्रमाणावर झालेली फेररचना, चार सदस्यांचा एक प्रभाग अशी रचना करण्यात आली. मतदार संख्याही ७० हजारांच्या आसपास आहे.
एकट्याच्या बळावर सत्ताप्राप्ती हे चारही प्रमुख पक्षांचे ध्येय होते. त्यातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांनी एकूण परिस्थिती ओळखून आघाडी केली. आता सत्तेसाठी साह्य लागले तर ते राष्ट्रवादीला काँग्रेसचेच मिळेल, पण त्यासाठी काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ होणे अपेक्षित होते. मावळत्या सभागृहात काँग्रेसच्या २९ जागा होत्या. भाजप आणि शिवसेना पहिल्यांदाच वेगवेगळे लढत आहेत. राज्य पातळीवर निर्माण झालेले वाद यामुळे स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर एकमेंकांना साथ मिळेल, का असा प्रश्न आहे. शिवसेनेने १५६ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. भाजपाबरोबर जाऊन सत्ता मिळवायची तर शिवसेनेला किमान २५ ते ३० जागा मिळाव्या लागतील. महाराष्ट्र नवनिर्माण सेना निर्णायक भूमिका बजावू शकेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
उत्सुकता निकालाची
महापालिकेची मतमोजणी सकाळी दहा वाजता प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात सुरू होणार आहे. प्रत्येक प्रभागाच्या पाच ते सात फेऱ्या होणार आहेत. एका प्रभागाच्या मतमोजणीसाठी अंदाजे ४ तास लागण्याची शक्यता आहे़ एका वेळी एकाच प्रभागाची मोजणी होणार असल्याने क्षेत्रीय कार्यालयात समाविष्ठ प्रभागांची मतमोजणी पूर्ण होण्यास १० ते १२ तास लागणार आहेत. पहिल्या चार तासांत १४ प्रभागांचा निकाल हाती येईल. काही प्रभागांचा निकाल समजण्यास मात्र रात्र होणार आहे. घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाची मोजणी २० टेबलवर करण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे़