भूमाता ब्रिगेडचा आरोपीस चोप

By Admin | Updated: February 8, 2017 03:23 IST2017-02-08T03:23:02+5:302017-02-08T03:23:02+5:30

हिंजवडी येथील इन्फोसिस कंपनीतील सॉफ्टवेअर इंजिनिअर रसिला राजू ओपी हिचा खून करणाऱ्या सुरक्षारक्षकाला भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी भर न्यायालयात चोप दिला़

Chumped the accused of the Bhumata brigade | भूमाता ब्रिगेडचा आरोपीस चोप

भूमाता ब्रिगेडचा आरोपीस चोप

पुणे : हिंजवडी येथील इन्फोसिस कंपनीतील सॉफ्टवेअर इंजिनिअर रसिला राजू ओपी हिचा खून करणाऱ्या सुरक्षारक्षकाला भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी भर न्यायालयात चोप दिला़ बंदोबस्तावरील पोलिसांनी त्याला तातडीने बाजूला नेले़ पोलिसांनी तृप्ती देसाई व त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेऊन सायंकाळी सोडून दिले़
भाबेन भराली सैकिया या सुरक्षारक्षकाची पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी संपत असल्याने त्याला पोलिसांनी दुपारी न्यायालयात आणले होते़ त्या वेळी अधिक तपासासाठी त्याला २ दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी पक्षातर्फे करण्यात आली होती. यास बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. बी. ए. आलुर, अ‍ॅड. तौसिफ शेख आणि अ‍ॅड. साजिद शाह यांनी विरोध केला. पोलिसांचा तपास पूर्ण झाला आहे. त्यामुळे सैकियाला पोलीस कोठडी देण्याची गरज नाही, असे बचाव पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर न्यायालयाने सैकियाची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.
न्यायालयाच्या निर्णयानंतर दुपारी चारच्या सुमारास पोलीस त्याला घेऊन नव्या इमारतीच्या बाहेर आले़ तोपर्यंत भूमाता ब्रिगेडच्या महिला कडेला दबा धरून बसल्या होत्या़ तो बाहेर येताच या महिलांनी धावत जाऊन पोलिसांच्या मध्ये असलेल्या भाबेनला मारहाण करण्यास सुरुवात केली़ तेव्हा पोलिसांनी त्याच्याभोवती कडे करून त्याला पुन्हा मागे घेऊन गेले़ त्यानंतर काही महिला गेल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्याला धावतच बाहेर नेण्यास सुरुवात केली़ तेव्हा आणखी दोन-तीन महिलांनी त्याला अडवून चोप दिला़
तृप्ती देसाई यांच्या समवेत मनीषा टिळेकर, रंजना कांबळे, ख्वाजा बी. मोमीन, प्रज्ञा जगताप, मंजिरी चौधरी या सहभागी झाल्या होत्या़
तृप्ती देसाई यांनी सांगितले, की गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही़ आमचा कायद्यावर विश्वास आहे़ पण, कोपर्डी प्रकरणात आरोपींना सहा महिन्यांत शिक्षा होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते़ त्याला सहा महिने उलटूनही अजून शिक्षा झालेली नाही़ पोलिसांनी आधीच खबरदारी घेतली असती तर ही घटना घडली नसती. आरोपींमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी ही ‘ताईगिरी’ सुरू केली आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Chumped the accused of the Bhumata brigade