न्हावरा-शिरूर गटात चुरस
By Admin | Updated: February 15, 2017 01:51 IST2017-02-15T01:51:02+5:302017-02-15T01:51:02+5:30
पुणे जिल्हा परिषदेच्या येत्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये न्हावरा-शिरूर ग्रामीण या जिल्हा परिषद गटामध्ये अत्यंत चुरशीचा सामना रंगला असून

न्हावरा-शिरूर गटात चुरस
निमोणे : पुणे जिल्हा परिषदेच्या येत्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये न्हावरा-शिरूर ग्रामीण या जिल्हा परिषद गटामध्ये अत्यंत चुरशीचा सामना रंगला असून, या लक्षवेधी निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. नवीन गट पुनर्रचनेनुसार पूर्वीच्या न्हावरा -रांजणगाव सांडस व शिरूर ग्रामीण रांजणगाव गणपती या दोन गटांचा काही भाग मिळून हा नवा गट तयार करण्यात आला आहे.
शिरूर-हवेलीचे विद्यमान आमदार बाबूराव पाचर्णे, जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे व सदस्या मनीषाताई कोरेकर, माजी सदस्य काकासाहेब कोरेकर, माजी सदस्या मंदाताई सरके, शिरूर पंचायत समितीचे सभापती सिद्धार्थ कदम, उपसभापती मंगल लंघे, माजी सभापती बाजीराव कोळपे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष दिलीप हिंगे, घोडगंगाच्या आजी-माजी संचालकांसह अनेक दिग्गजांचा हा मतदार संघ. शिवाय तालुक्याच्या सहकाराचा केंद्रबिंद असणारा घोडगंगा याच गटात!
त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या तालुक्यात असणाऱ्या सात जागांपैकी ही एकमेव जागा सर्वसाधारण पुरुष या वगार्साठी खुली असल्याने तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीमध्ये पुणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य राहुल पाचर्णे ( भाजपा), करडे गावचे माजी आदर्श सरपंच राजेंद्र जगदाळे ( राष्ट्रवादी ), शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे तालुकाप्रमुख अनिल पवार (शिवसेना), कळवंतवाडीचे सामाजिक कार्यकर्ते सुभाष कोळ्पे( काँग्रेस आय.), तालुका कामगार आघाडीचे माजी पदाधिकारी रवींद्र निंबाळकर ( अपक्ष ) हे पाच जण निवडणूक रिंगणात आहेत.
सामना पंचरंगी असला, तरी खरी लढाई भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच खरी लढत होईल, असा जाणकारांचा अंदाज आहे.
राहुल पाचर्णे हे गतपंचवार्षिक मधील कामाचा अनुभव, सत्तेवर असणारा पक्ष व आमदार वडिलांच्या पाठबळावर निवडणूक लढवत आहेत. तर राजेंद्र जगदाळे हे करडे गावचे सरपंच असताना गावातील विकासकामे, युवकांचे संघटन व राष्ट्रवादी पक्षाच्या सर्वच दिग्गजांच्या बळावर नशीब अजमावत आहेत. शिवसेनेचे अनिल पवार यांचे ग्राहक कक्षाच्या माध्यमातून कार्य आहे.कॉंग्रेसचे उमेदवार सुभाष कोळपे व अपक्ष रवींद्र निंबाळकर यांचेही स्थानिक पातळीवर कार्य आहे.
सध्या सर्वच पक्षांकडून प्रचाराचा धुराळा उडत आहे. नोटबंदी, कांद्यासह शेतीमालाचे पडलेले भाव, चासकमानचे पाणी, सहकाराचे खासगीकरण, स्थानिक प्रश्न इ. च्या भोवती निवडणूक फिरत आहे. कोपरा सभा, घोंगडी बैठका, वैयक्तिक भेटीगाठीच्या माध्यमातून प्रचाराची राळ उडत असून जाहीर सभांमधून आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. प्रत्येक उमेदवार विजयाचा दावा करत आहे. मात्र, त्यासाठी मतदारांना काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. (वार्ताहर)