निवडणुकीसाठी शहराच्या प्रवेशद्वारावर चेक पोस्ट
By Admin | Updated: January 29, 2017 04:16 IST2017-01-29T04:16:20+5:302017-01-29T04:16:20+5:30
महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असून, निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. शहराच्या प्रवेशद्वारावर चेक पोस्ट उभारण्यात आले असून,

निवडणुकीसाठी शहराच्या प्रवेशद्वारावर चेक पोस्ट
पिंपरी : महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असून, निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. शहराच्या प्रवेशद्वारावर चेक पोस्ट उभारण्यात आले असून, वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. चार दिवसांत एक हजार वाहनांची तपासणी करण्यात आली आहे.
महापालिका निवडणुकीसाठी २१ फेबु्रवारीला मतदान होत असून, २३ फेबु्रवारीला निकाल लागणार आहे. मतदानाचा टक्का वाढण्यासाठी निवडणूक विभागाकडून नियोजन केले जात आहे. पथनाट्य, रॅली, मेळावे आयोजित केले जात आहेत. यासह शांततेत मतदान प्रक्रिया पार पडण्यासाठी पोलीस प्रशासन आणि निवडणूक विभाग सज्ज झाला आहे. पोलिसांकडून कोम्बिंग आॅपरेशन करण्यासह सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. पिस्तुले जमा केली जात आहेत. यासह कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत.
शहरात येणाऱ्या संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे. यासाठी शहराच्या प्रवेशद्वारावर चेक पोस्ट उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी तीन जणांचे पथक तैनात करण्यात आले आहे.
यामध्ये पोलीस कर्मचारी, निवडणूक विभागाचे कर्मचारी, तसेच व्हिडीओग्राफर यांचा समावेश आहे. तपासणी केल्या जाणाऱ्या
वाहनांचे चित्रीकरणदेखील केले जात आहे. रात्रपाळी आणि दिवसपाळीमध्ये पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.
निगडीतील भक्ती-शक्ती चौक, तळवडेतील आयटी पार्क चौक, रावेत-किवळेमधील मुकाई चौक, काळाखडक भूमकर चौक, मोशी टोल नाका, आळंदी फाटा, वाकड आदी ठिकाणी हे चेक पोस्ट आहेत. संशयित वाहन आढळल्यास अशा वाहनांची कसून तपासणी केली
जात आहे. वाहनात काही संशयित वस्तू आढळल्यास कोठून आणली आहे, कुठे घेऊन जाणार आहे याबाबतची खात्री केली जात आहे. वाहनांतील व्यक्तींच्या संशयास्पद हालचाली आढळल्यास त्यांच्याकडेही कसून चौकशी केली जात आहे. (प्रतिनिधी)
शहराच्या प्रवेशद्वारावर वाहनांची तपासणी केली जात आहे. २४ ते २७ जानेवारी या कालावधीत शहरातील सात चेक पोस्टवर १ हजार ५० वाहनांची तपासणी करण्यात आली. संशयास्पद हालचाली आढळून आल्यास वाहनांची कसून चौकशी करून कारवाई करणार आहे.
- संभाजी ऐवले, नियंत्रण अधिकारी आचारसंहिता कक्ष
गैरप्रकाराला आळा
निवडणूक काळात मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला जात असल्याची चर्चा असते. या गोष्टींना आळा बसावा, तसेच असे काही प्रकार होत असल्यास निवडणूक विभागाला कळवावे, याबाबत आवाहन केले जात आहे.