सीएचबी प्राध्यापकांच्या मानधनवाढीला नकारघंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 12:21 PM2018-03-12T12:21:50+5:302018-03-12T12:21:50+5:30

सीएचबी प्राध्यापकांना अगदी शिपायांपेक्षाही कमी वेतन मिळत असल्याने त्यांच्यामध्ये नैराश्याची भावना वाढीस लागली आहे.

CHB professors honorarium refuse to increase | सीएचबी प्राध्यापकांच्या मानधनवाढीला नकारघंटा

सीएचबी प्राध्यापकांच्या मानधनवाढीला नकारघंटा

Next
ठळक मुद्देमानधनात प्रतितास २५० रुपयांहून ५०० रुपये इतकी वाढ करण्याचा प्रस्ताव उच्च शिक्षण संचालनालयाने राज्य शासनाकडे सादरवित्त विभागाची मान्यता मिळत नसल्याने हा प्रस्ताव रखडलेलाशिक्षणमंत्री विनोद तावडे यांना प्राध्यापक भरती त्वरित सुरू करावी, अशी मागणी नेट/सेटग्रस्त प्राध्यापकांकडून करण्यात येत आहे.

पुणे : राज्यात प्राध्यापकांच्या रिक्त जागांवर तासिका तत्त्वावर (सीएचबी) शिकविणाऱ्या प्राध्यापकांच्या मानधनात २५० रुपयांवरून ५०० रुपये वाढ करण्याच्या प्रस्तावाला राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून मंजुरी देण्यात आली नाही. नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात याबाबतची तरतूद होईल, अशी अपेक्षा लावून बसलेल्या हजारो सीएचबी प्राध्यापकांची यामुळे घोर निराशा झाली आहे.  
राज्यात प्राध्यापकांच्या भरतीला सध्या स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे महाविद्यालयातून प्राध्यापक निवृत्त झाल्यानंतर त्यांची जागा रिक्त राहत आहे. त्याचबरोबर यापूर्वीच्याही शेकडो जागा रिक्त आहेत. या जागांवर नव्याने सेट-नेट होणारे तरुण तासिका तत्त्वांवर कार्यरत आहेत. त्यांना तासाला अवघे २५० रुपये मानधन देण्यात येत आहे. त्याचबरोबर त्यांना आठवड्यामध्ये ७ तासांपेक्षा जास्त काम देता येत नाही. त्यामुळे महिन्याला अवघ्या ६ ते ७ हजारांच्या तटपुंज्या मानधनावर त्यांना काम करावे लागत आहे. या मानधनात प्रतितास २५० रुपयांहून ५०० रुपये इतकी वाढ करण्याचा प्रस्ताव उच्च शिक्षण संचालनालयाने राज्य शासनाकडे सादर केला आहे. मात्र वित्त विभागाची मान्यता मिळत नसल्याने हा प्रस्ताव रखडलेला आहे. 
पारंपरिक महाविद्यालयातील प्राध्यापकांना तासाला केवळ २५० रुपये मानधन दिले जात असतानाच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयातील प्राध्यापकांना मात्र प्रतितास ८०० रुपये मानधन देण्याच्या प्रस्तावाला यापूर्वीच मंजुरी देण्यात आली आहे. व्यावसायिक आणि पारंपरिक अभ्यासक्रमांमध्ये शासनाकडून भेदभाव केला जात असल्याची भावना प्राध्यापकांकडून व्यक्त करण्यात आली आहे. सीएचबी प्राध्यापकांना अगदी शिपायांपेक्षाही कमी वेतन मिळत असल्याने त्यांच्यामध्ये नैराश्याची भावना वाढीस लागली आहे. सीएचबीबरोबरच विनाअनुदानित महाविद्यालयामध्ये काम करणाऱ्या  प्राध्यापकांनाही अत्यंत कमी वेतन दिले जात आहे
  प्राध्यापकांची भरती त्वरीत सुरु करावी 
शासनाने प्राध्यापक भरतीला सध्या स्थगिती दिली आहे. त्याचा महाविद्यालयातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे प्राध्यापक भरती त्वरित सुरू करावी, अशी मागणी नेट/सेटग्रस्त प्राध्यापकांकडून करण्यात येत आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना वेळोवेळी निवेदनही देण्यात आले आहे. शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक भरती जून २०१८ पर्यंत सुरू केली जाईल, असे तावडे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांची भरती कधी सुरू होणार, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अत्यंत तटपुंज्या मानधनात काम करावे लागत असल्याने अनेक सेट-नेटधारक प्राध्यापक शिक्षकी पेशाकडे वळण्याचे टाळत आहेत. त्यामुळे केवळ नुकतीच एमए, एमएस्सी झालेली मुले अनेक महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून शिकवू लागली आहेत. यामुळे उच्च शिक्षणाचा दर्जा मोठ्या प्रमाणात घसरू लागला आहे.

Web Title: CHB professors honorarium refuse to increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.