चाळकवाडीत भुरट्या चोऱ्यांत वाढ
By Admin | Updated: February 23, 2017 02:15 IST2017-02-23T02:15:31+5:302017-02-23T02:15:31+5:30
चाळकवाडी परिसरात भुरट्या चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली असून मंगळवारी (दि.२१) रात्री दहाच्या

चाळकवाडीत भुरट्या चोऱ्यांत वाढ
पिंपळवंडी : चाळकवाडी परिसरात भुरट्या चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली असून मंगळवारी (दि.२१) रात्री दहाच्या सुमारास या भुरट्या चोरांनी घरात प्रवेश करून रोख रक्कम लंपास केली.
हनुमंत पारधी यांच्या घरामधील सर्वजण कीर्तन ऐकण्यासाठी गेले असता, या भुरट्या चोरांनी घराच्या मागील बाजुने घरात प्रवेश करून घरातील सामानाची उचकपाचक केली व पारधी यांच्या मुलांनी खाऊच्या पैशांतून बचत केलेल्या पैशांवर डल्ला मारला. परंतु, ही रक्कम नक्की किती, हे समजू शकले नाही. ही घडत असताना पारधी यांचा मुलगा प्रसाद हा पाणी पिण्यासाठी घरात आला असता त्याने तिघांना पळून जाताना पाहिले. त्यांचा पाठलाग केला; परंतु अंधाराचा फायदा घेत चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. या चोरट्यांनी अंगात काळे जर्कीन व कानटोपी घातली होते, असल्याचे प्रसाद याने सांगितले. चाळकवाडी परिसरात यापूर्वीही अनेकवेळा भुरट्या चोऱ्या झाल्या होत्या. या चोऱ्या किरकोळ असल्याने या चोऱ्यांची तक्रार नागरिक करत नाहीत. त्यामुळे या भुरट्या चोरांचे चांगलेच फावले आहे. परिसरात पोलीस गस्त सुरू केल्यास या भुरट्या चोऱ्यांना आळा बसेल, असे नागरिकांचे म्हणणे असून पोलिसांनी पोलीस मित्रांची संघटना करून त्यांच्या सहकायार्ने गस्त सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे. (वार्ताहर)