पुणे : महापालिका आयुक्तांना निवेदन देताना गोंधळ घातल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध बुधवारी रात्री उशीरा सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
महापालिका आयुक्तांच्या दालनाता निवेदन देण्यासाठी आलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी सायंकाळी गोंधळ घातला. मनसेचे कार्यकर्ते महापालिका आयुक्तांच्या अंगावर धावून गेले आणि त्यांनी ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर महापालिकेचे अधिकारी रात्री शिवाजीनगर पोलिस ठाण्यात पोहोचले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून या प्रकरणी तक्रार देण्यात येणार आहे. महापालिका अधिकाऱ्यांकडून रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी फिर्याद देण्याचे काम सुरू होते. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी (भारतीय न्यायसंहिता १३२) अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. महापालिका अधिकाऱ्यांकडून फिर्यादीत मनसे पदाधिकाऱ्यांची नावे देण्यात येणार आहे. त्यांनी दिलेली नावे, तसेच फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
नेमकं काय घडलं?
आज पुणे महानगरपालिकेत आयुक्त नवल किशोर राम आपल्या दालनात एक बैठक घेत होते. त्याचवेळी मनसेचे नेते किशोर शिंदे काही कार्यकर्त्यांसह थेट त्यांच्या कक्षात प्रवेशले. या अनधिकृत प्रवेशामुळे आयुक्त भडकले आणि त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना तातडीने दालनाबाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर कार्यकर्ते संतप्त होऊन बाहेरच ठिय्या देऊन बसले. या दरम्यान दोन्ही बाजूंनी शाब्दिक चकमक सुरु झाली.
आयुक्त संतापले
"माझी बैठक सुरु असताना तुम्ही थेट आत आलात, धमकी दिली, ही पद्धत योग्य आहे का?" असा सवाल आयुक्तांनी केला. यावर किशोर शिंदे यांनी प्रतिउत्तर दिलं, "आम्ही काय धमकी दिली? आम्हाला दिलेली धमकी सुद्धा सांगा!" यावर आयुक्त म्हणाले, "तुम्ही दोन मिनिटं थांबू शकत नव्हता का? तुम्ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला बदनाम करणारे गुंड आहात."