पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये आज राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (sharad pawar metro ride) यांनी मेट्रोने प्रवास केला आहे. पवारांनी फुगेवाडी ते पिंपरी चिंचवड महापालिकेपर्यंतचा प्रवास केला होता. आता यावर बोलताना भाजप नेते चंद्रकांत पाटील (chandrakant patil) म्हणाले, आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काम जनतेला कळत नाही का? पिंपरी चिंचवड मेट्रोची ट्रायल कुठल्याही स्थानिक खासदार, आमदाराला न कळवता राज्यसभेचे सदस्य शरद पवार यांच्या कशी होऊ शकते, असा प्रश्नही चंद्रकांत पाटील यांनी विचारला.
पुढे बोलताना पाटील म्हणाले, मेट्रोने अशाप्रकारे घाईघाईने ट्रायल करण्याचे कारण काय आहे. यामधून श्रेयवादाची लढाई सुरु आहे का? ११ हजार कोटींच्या या प्रकल्पामधील आठ हजार कोटी केंद्राने दिले आहेत. कोविडमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणारे उद्घाटन पुढे ढकलण्यात आले होते. मेट्रोच्या ट्रायलला फक्त शरद पवार का?,” असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.
पुणे मेट्रोचे काम सध्या जलदगतीने सुरु आहे. पिंपरी चिंचवडमध्ये तर मेट्रोच्या यशस्वी चाचण्याही झाल्या आहेत. कोरोनाच्या सुरुवातीला २०२० मध्ये मेट्रोच्या कामात बराच खंड पडला होता. त्यानंतर जानेवारी २०२१ च्या सुरुवातीला पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी या सहा किमीच्या प्राधान्य मार्गावर मेट्रोची चाचणी यशस्वी झाली होती. आताच्या नवीन वर्षांत मेट्रोतून सफर करण्याचे स्वप्न पूर्ण झाले असून पिंपरी - चिंचवडमधील ही मेट्रो धावण्यास सज्ज आहे. पिंपरीतील या फुगेवाडी स्टेशनला राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी भेट दिली. फुगेवाडी ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिका असा मेट्रोने प्रवासही केला आहे.