चांडोलीचे ट्रॉमा सेंटर दीड वर्षांपासून धूळ खात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 03:03 IST2018-05-27T02:41:07+5:302018-05-27T03:03:55+5:30
चांडोली रुग्णालयलगत कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेले ट्रॉमा केअर सेंटर गेल्या दीड वर्षापासून धूळ खात पडून आहे. ट्रॉमा केअर सेंटरमध्ये नवीन वैद्यकीय यंत्रसाम्रगी आली असतानाही सेंटर सुरू केले जात नाही.

चांडोलीचे ट्रॉमा सेंटर दीड वर्षांपासून धूळ खात
दावडी - चांडोली रुग्णालयलगत कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेले ट्रॉमा केअर सेंटर गेल्या दीड वर्षापासून धूळ खात पडून आहे. ट्रॉमा केअर सेंटरमध्ये नवीन वैद्यकीय यंत्रसाम्रगी आली असतानाही सेंटर सुरू केले जात नाही. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असून रुग्णांचे हाल होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
पुणे-नाशिक महामार्गावरील अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय सेवा देण्यासाठी तसेच खेड तालुक्यातील रुग्णांना तातडीने अत्यावश्यक सेवा मिळावी, यासाठी चांडोली येथे अद्ययावत ट्रॉमा केअर सेंटरची इमारत बांधण्यात आली. सेंटरच्या उभारणीनंतर आॅथोर्पेडिक विभाग, आयसीयू युनिट, आॅपरेशन थिएटर, अपघात कक्ष विभाग, एक्स-रे विभागसह आदी सोयीसुविधा उपलब्ध होणार होत्या. महिन्यापूर्वी सेंटरमध्ये वैद्यकीय यंत्रसामग्री आली; मात्र अद्यापही काही वैद्यकीय यंत्रसामग्री येणे बाकी आहे. त्यामुळे सेंटर बंदच असून नवीन आलेल्या वैद्यकीय यंत्रसामग्री धूळ खात पडून आहे. अपघातानंतर जखमींना थेट पुणे, पिंपरी-चिंचवड येथे हलविण्यात येते. झालेल्या अपघातग्रस्तांना दोन ते तीन तासांनी उपचार मिळतात.
यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण वाढत असून, याचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी केली जात आहे.
ट्रॉमा सेंटरमध्ये वैद्यकीय यंत्रसाम्रगी अपूर्ण असल्यामुळे रुजू झालेले वैद्यकीय अधिकारी कधी येतात व कधी जातात, कोणालाच कळत नाही. तसेच, शेजारील रुग्णालयातही ते दिसत नसल्याचे चित्र आहे.
चांडोली येथे दररोज तालुक्यातून शेकडो रुग्ण उपचारांसाठी येतात. रुग्णालयात एक्स-रे, सोनोग्राफी मशीन आहे; मात्र वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयात जाऊन जादा पैसे देऊन उपचार घ्यावे लागत आहेत. त्यामुळे रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोे.
पॅथालॉजीची सेवा २४ तास उपलब्ध नसल्याने रात्री रुग्णांना बाहेरून तपासणी करून आणावी लागते. यामुळे गरीब रुग्णांना हेलपाटे मारण्याशिवाय पर्याय नसतो.
अपघातग्रस्तांना मदत मिळावी, यासाठी येथे ट्रॉमा केअर सेंटर उभारण्याचा निर्णय झाला. इमारतीचे काम पूर्ण झाले; मात्र प्रत्यक्षात ट्रॉमा सेंटर कधी सुरू होईल, याबाबत अनभिज्ञताच आहे.
रस्ते अपघातानंतर वेळेत
उपचार मिळाले नाहीत म्हणून शेकडो नागरिकांचा दर वर्षी मृत्यू होतात. या पार्श्वभूमीवर, शासनाने महत्त्वाच्या रस्त्यांवर ट्रॉमा सेंटर
सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला होता. ट्रॉमा सेंटर सुरू झाल्यास नागरिकांचे हाल थांबतील, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.