साखळीचोर पोलिसांच्या ताब्यात
By Admin | Updated: January 12, 2016 04:05 IST2016-01-12T04:05:58+5:302016-01-12T04:05:58+5:30
दोन धाडसी वृत्तपत्रविक्रेत्या युवकांच्या प्रसंगावधनामुळे दोघे सोनसाखळी चोरटे पोलिसांच्या तावडीत सापडले. एका महिलेच्या डोळ्यांत मिरचीची पूड टाकून दुचाकीवरून

साखळीचोर पोलिसांच्या ताब्यात
पुणे : दोन धाडसी वृत्तपत्रविक्रेत्या युवकांच्या प्रसंगावधनामुळे दोघे सोनसाखळी चोरटे पोलिसांच्या तावडीत सापडले.
एका महिलेच्या डोळ्यांत मिरचीची पूड टाकून दुचाकीवरून पळून जाणाऱ्या या चोरांना पाठलाग करून पकडण्यात युवकांना यश आले. पकडल्यानंतर या चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण तिथेही त्यांची गाठ एका सहायक फौजदाराशी पडली व शरण येण्याशिवाय दुसरा पर्यायच त्यांच्यापुढे राहिला नाही.
स्वप्निल सुरेंद्र गायकवाड (वय २३, रा़ हडपसर गाडीतळ) व फय्याज हनीफ शेख (वय २९, रा़ रविवार पेठ) अशी पकडलेल्या चोरट्यांची नावे आहेत. त्यांना शंतून सोपानराव गव्हाणे व राजेश दिलीप माचुतरे यांनी पाठलाग करून पकडले. शंतनू नळस्टॉप येथील वृत्तपत्रविक्रेता आहे. रेखा नितीन तनपुरे (रा. मधुराज सोसायटी, पौड रस्ता) यांनी याबाबत कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दोघांनाही अटक करण्यात आली आहे़ हा प्रकार पौड रस्त्यावर प्रशांत सोसायटीजवळ रात्री साडेआठच्या सुमारास घडला.
रेखा तनपुरे या सायंकाळी फिरण्यासाठी म्हणून बाहेर पडल्या होत्या. त्या साडेआठच्या सुमारास घरी निघाल्या. प्रशांत सोसायटीजवळ चोरटे दुचाकी थांबवून उभे होते. त्यांच्यातील एकाने तनपुरे यांच्या डोळ्यांत मिरचीची पूड फेकली व गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. तनपुरे यांनी पटकन डोळे मिटल्यामुळे त्यांच्या डोळ्यांत तिखट गेले नाही. त्यांनी साखळी हिसकावणाऱ्याचा शर्ट हाताने घट्ट धरला व मोठ्याने ओरडण्यास सुरुवात केली. चोरट्यांनी तिथून पळ काढला मात्र पाठलाग करून शंतनू आणि राजेश यांनी चोरट्यांना पकडताच तिथे उभे असलेले सहायक फौजदार राजेंद्रसिंह चौहान यांनी त्यांच्यावर झडप टाकली. त्यानंतर त्यांना एरंडवणा पोलीस चौकीत आणण्यात आले. (प्रतिनिधी)