विद्यार्थ्याचा आत्मविश्वास टिकविण्याचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:09 IST2021-06-03T04:09:50+5:302021-06-03T04:09:50+5:30
तशातच पदरी दोन मुलं, त्यांचाही खर्च. महामारीमुळे गेल्या वर्षी शाळा बंद, अध्ययन बंद, अध्यापन बंद, ऑनलाईन शिक्षण सुरू होते. ...

विद्यार्थ्याचा आत्मविश्वास टिकविण्याचे आव्हान
तशातच पदरी दोन मुलं, त्यांचाही खर्च. महामारीमुळे गेल्या वर्षी शाळा बंद, अध्ययन बंद, अध्यापन बंद, ऑनलाईन शिक्षण सुरू होते. पण, तो काही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा अंतिम मार्ग नव्हे. एखाद्या विषयाचा मूलभूत घटक पूर्णपणे समजल्याशिवाय त्या घटकाचे प्रगत ज्ञान वरिष्ठ गटातील मुलांना सुद्धा ऑनलाईन समजणार नाही. त्याची बैाद्धिक पातळी कितीही प्रगल्भ असला, तरी तो पारंगत होणे कठीणच.
वर्गामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधील आंतरक्रिया अध्ययन अनुभवासाठी फार गरजेच्या असतात. खासगी शिकवणी किंवा ऑनलाईन शिक्षण कोणत्या विद्यार्थ्याला मिळते याचे काही सर्वेक्षण झाले का? राज्यामध्ये ७० टक़्के विद्यार्थी हा ग्रामीण भागात आहे. १ ली ते १२ वी पर्यंतच्या किती विद्यार्थ्यांना ऑनलाइन किंवा खासगी शिकवणीतून शिक्षण मिळाले? याची पाहणी करायला हवी. खासगी शिकवणीचे वर्गही बंदच होते. इ. ९ वीचा आणि इ.१० वीचा विद्यार्थी तर बहिस्थ: विद्यार्थीच झाला आहे. १ ली ते ८ वीपर्यंत अंतर्गत मूल्यमापनातूनच तो शिक्षण हक्क कायद्यानुसार वर्गोन्नत होतो. इ. ९ वी आणि १० वी मध्ये त्याचे खऱ्या अर्थाने मूल्यमापन होते. (प्रचलित नियमानुसार). याचा खऱ्या अर्थाने गांभीर्याने विचार करायला कोरोनाने आपल्याला भाग पाडले असे म्हटल्यास वावगे करणार नाही.
इ. ९ वीच्या वर्गापासूनच इ. १० वीच्या म्हणजेच एस. एस. सी.च्या सार्वजनिक परीक्षेची तयारी शाळांमधून करून घेतली जाते. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्येसुद्धा इ. १० वी चे वर्ग चालू असतात. पालक आणि विद्यार्थीही या बाबतीत गंभीर असतात. कारण, या सार्वजिनक परीक्षेमध्ये आपला विद्यार्थी अथवा पाल्य चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावा, ही मनीषा बाळगूनच सर्वजण काम करत असतात. काहींना पुढील करिअर घडवण्यासाठी कला/वाणिज्य/विज्ञान/शास्त्रामधून उच्च शिक्षण घ्यावयाचे असते. काहींना १० वीनंतर अल्पमुदतीचे कोर्स करून मिळवते व्हायचे असते, तर काहींना एखादी पदवीका पूर्ण करून स्वावलंबी व्हायचे असते. याचाच अर्थ असा की, विद्यार्थ्याच्या जीवनातील चांगल्या वाटा शोधण्याचे मार्ग एस.एस.सी.नंतर सापडत असतात. त्याची खरी बुद्धिमत्ता / गुणवत्ता याच टप्प्यावर ज्याला कळू शकते. त्याचा आत्मविश्वास वाढायला मदत होते. हा एक प्रकारचा पाैगंडावस्था आणि कुमारावस्था यातील संघर्ष असतो. त्याच्या मनाची परिपक्वता होत असताना त्याच्या आत्मविश्वासाचे बळ मिळत असते. ते याच वयात, याच टप्प्यावर.
मात्र, या वर्षी महामारीचे दुर्दैव पुन्हा आडवे आले. विद्यार्थ्याची शिक्षण प्रक्रियाच थंडावली, नाही गोठली गेली. त्यांचे भवितव्य अंधारमय वाटायला लागले. हे केवळ काही आपल्या राज्यापुरतेच मर्यादित आहे, असे नाही तर संबंध देशभर हीच स्थिती थोड्याफार फरकाने आहे. त्यामुळे हा विद्यार्थी आत्मविश्वास गमावून बसतो की काय? अशी भीती वाटते. भविष्यात महामारीच्या संकटातूनही पुढे जाणाऱ्या आणि करिअर घडवलेल्या विद्यार्थ्यांचा तर शिक्षणतज्ज्ञांना अभ्यासाचा विषय होईलच. पण आत्मविश्वास गमावून बसलेल्या आणि करिअर घडवलेल्या विद्यार्थ्यांचा तर शिक्षणतज्ज्ञांना अभ्यासाचा विषय होईलच. पण आत्मविश्वास गमावून बसलेल्या आणि करिअर उज्ज्वल न करू शकलेल्या विद्यार्थ्याचे काय? नुकसान झाले, त्यांचा जीवनपट कसा राहील याचेही चिंतन करावे लागेल.
अशा परिस्थितीतसुद्धा शासनाने महत्त्वाच्या इ. ९ वी आणि १० वीच्या अंतर्गत मूल्यमापनावरून एस.एस.सी.चा अंतिम निकाल जो चांगलाच असेल, देण्याचा निर्णय सर्वसमावेशक वाटतो. परंतु हेच विद्यार्थी पुढे ज्या ज्या शाखेत जातील त्या त्या शाखेमध्ये इ. १० वी अभ्यासक्रमाची उजळणी होण्यासाठी त्यांना पूर्वतयारी म्हणून नियमित वर्गात करून घ्यावी लागेल. कारण, त्यांना जे संबोध स्पष्टपणे समजलेले नाहीत ते समजून दिल्यास त्यांचा पुढचा शैक्षणिक प्रवास सोपा होण्यास मदत होईल. शिवाय, त्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून निघण्यास मदत होऊ शकेल.
-महावीर माने
माजी शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य