चाकणला कुत्र्याचा धुमाकूळ
By Admin | Updated: June 12, 2017 01:14 IST2017-06-12T01:14:12+5:302017-06-12T01:14:12+5:30
मोकाट कुत्र्यांसह पिसाळलेल्या कुत्र्याने गेल्या अनेक दिवसांपासून चाकण परिसरात धुमाकूळ घालत चार चिमुकल्या बालकांसह येथील वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यालाही जबर

चाकणला कुत्र्याचा धुमाकूळ
लोकमत न्यूज नेटवर्क
आसखेड : मोकाट कुत्र्यांसह पिसाळलेल्या कुत्र्याने गेल्या अनेक दिवसांपासून चाकण परिसरात धुमाकूळ घालत चार चिमुकल्या बालकांसह येथील वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यालाही जबर चावा घेत गंभीर जखमी केल्याची घटना चाकण (ता. खेड) येथील बाजारपेठ भागात घडली.
चावा घेतलेल्या बालकांसह वीज कर्मचाऱ्याला उपचारासाठी प्रथम चाकण येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, या ठिकाणी रेबीज लस उपलब्ध नसल्याने त्या सर्वांना पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
धुमाकूळ घालणाऱ्या पिसाळलेल्या कुत्र्यास पकडण्याची कुठलीही यंत्रणा चाकण नगरपरिषदेकडे उपलब्ध नसल्याने पिसाळलेले कुत्रे मोकाट असून, श्वान दंश प्रतिबंधक लस येथील ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध असतानाही ती लस रुग्णांना देण्यास टाळाटाळ होत असल्यामुळे नागरिक सध्या या कुत्र्यांच्या दहशतीखाली वावरत आहेत.
चाकणमधील बाजारपेठ, शनिमंदिर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने गेल्या काही दिवसांपासून चांगलाच धुमाकूळ घातला आहे. रविवारी या पिसाळलेल्या कुत्र्याने बाजारपेठेतील बालगणेश मंडळाच्या समोर श्रवण नितीन पानसरे (वय ८, रा. बाजारपेठ, चाकण) या बालकाच्या खांद्याला चावा घेऊन जबर जखमी केले. शनिमंदिर येथे अथर्व हेमवंत (वय १०) या बालकाच्या पाठीला याच कुत्र्याने चावा घेतला. कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सार्थक भगवान कुटे (वय १०, रा. खंडोबामाळ, चाकण) या बालकाला गंभीर जखमा होऊन सुमारे सात टाके घालण्यात आले आहेत. खंडोबामाळ येथे राणी पाटील या आठवर्षीय मुलीला याच कुत्र्याने चावा घेतल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. तसेच येथील वीज वितरण कंपनीचे कर्मचारी यशवंत पोटेसह अन्य ठिकाणीही याच कुत्र्याने सात ते आठ जणांना चावा घेतल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.