‘एफटीआय’च्या विद्यार्थ्यांवर केंद्र सरकारची दडपशाही
By Admin | Updated: August 20, 2015 02:22 IST2015-08-20T02:22:46+5:302015-08-20T02:22:46+5:30
केंद्र सरकारने समाजमनावर थेट प्रभाव पाडणाऱ्या देशातील प्रमुख संस्था बंद करण्याचा घाट घातला आहे. ‘एफटीआयआय’ संस्थेतील आंदोलन करणाऱ्या

‘एफटीआय’च्या विद्यार्थ्यांवर केंद्र सरकारची दडपशाही
पुणे : केंद्र सरकारने समाजमनावर थेट प्रभाव पाडणाऱ्या देशातील प्रमुख संस्था बंद करण्याचा घाट घातला आहे. ‘एफटीआयआय’ संस्थेतील आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अटक करून दडपशाही सुरू केली आहे. ही सुरुवात असून, सरकारकडून यापुढे शिक्षण संस्था व माध्यम संस्था टार्गेट करण्याचा कार्यक्रम राहणार आहे, अशी टीका काँग्रेसचे राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी बुधवारी केली.
शहर काँग्रेस कमिटीतर्फे ‘राजीव गांधी जीवनदर्शन’ या दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन मोहन प्रकाश यांच्या हस्ते घोले रस्ता आर्ट गॅलरी येथे झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. काँग्रेसचे शहराध्यक्ष अॅड. अभय छाजेड, उपमहापौर आबा बागुल, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा कमल व्यवहारे, आमदार शरण रणपिसे, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, रमेश बागवे, नगरसेवक संजय बालगुडे, नरेंद्र व्यवहारे, मुख्तार शेख, नीता रजपूत आदी उपस्थित होते. एनएसयूआयचे अतुल म्हस्के व छायाचित्रकार सुशील राठोड यांनी जीवनदर्शनाची संकल्पना साकारली. २५ वर्षांतील १५० दुर्मिळ फोटोंचा प्रदर्शनात समावेश आहे.
राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी एफटीआयच्या विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. मात्र, केंद्र व राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यापेक्षा त्यांना अटक करण्याची कारवाई दुर्दैवी आहे. एफटीआय नव्हे, तर देशातील बँका व संशोधन संस्थावर चुकीच्या व्यक्तींची नियुक्ती करून खोटारडा कारभार सुरू आहे. सेबीमध्ये लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांच्या बंधूची नियुक्ती केली आहे. त्यामुळे सरकारला कंटाळून अनेक महत्त्वाच्या व्यक्तींनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, राजीव गांधी यांनी देशातील विज्ञान व तंत्रज्ञान विकासासाठी अनेक शास्त्रज्ञांना प्रोत्साहन दिले होते. त्यामुळे संगणकयुगाला सुरुवात झाली. महिला आरक्षणाचा पहिल्यांदा निर्णय घेतला. गेल्या ६० वर्षांत काँग्रेस सरकारने हे करून दाखविले आहे, असे मोहन प्रकाश यांनी सांगितले. राजीव गांधी यांच्या कारभारावर टीका करणारे भाजपच्या तत्कालीन नेत्यांनी पुन्हा त्यांचे कौतुक केले होते. त्याप्रमाणे काँग्रेसवर टीका करणारांवर ही वेळ येणार आहे, असे उल्हास पवार यांनी सांगितले. अॅड. अभय छाजेड यांनी प्रास्ताविक केले. आबा बागुल यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)