नाटकाच्या प्रयोगावर सेन्सॉरशिप ठरावी
By Admin | Updated: February 13, 2017 01:12 IST2017-02-13T01:12:39+5:302017-02-13T01:12:39+5:30
नाटक, चित्रपट हे अभिव्यक्तीचे उत्तम माध्यम आहे. या माध्यमांतून निखळ करमणूक अनुभवायला मिळते. नाटक, चित्रपट विचारप्रवर्तक असू शकतात.

नाटकाच्या प्रयोगावर सेन्सॉरशिप ठरावी
नाटक, चित्रपट हे अभिव्यक्तीचे उत्तम माध्यम आहे. या माध्यमांतून निखळ करमणूक अनुभवायला मिळते. नाटक, चित्रपट विचारप्रवर्तक असू शकतात. मात्र, त्यातून मोठे सामाजिक बदल किंवा क्रांती घडत नाही.
मुंबई ही नाट्यव्यवसायाची बाजारपेठ असेल, तर पुणे ही प्रयोगशाळा आहे, असे मला वाटते. नवोदित कलाकार येथे जीव ओतून काम करतात, व्यासपीठाचा उत्तम उपयोग करून घेतात, घडतात आणि संपूर्ण तयारीनिशी रंगभूमीवर उतरतात. गेल्या काही वर्षांत रंगभूमी तसेच चित्रपटसृष्टीमध्ये सकारात्मक बदल पाहायला मिळत आहेत. तरुणांचा मालिका, चित्रपटांकडील ओघ वाढला आहे. कारण, हजारो तरुणांना सामावून घेण्याएवढा नाट्यव्यवसाय मोठा आणि व्यापक नाही. तसेच, चित्रपट, मालिकांमध्ये अभिनय करूनही नाटक हा पाया असल्याने त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
‘हे राम नथुराम’ या नाटकाचे १००० हून अधिक प्रयोग यशस्वी झाले आहेत. या नाटकाविरोधात अचानक आंदोलने सुरू झाली आहेत. पुण्यात आंदोलने करून नाटक बंद पाडण्याचा प्रयत्न झाला, तर नागपूरमध्ये प्रेक्षकांनी तिकिटेच न काढून प्रयोग रद्द करण्यास भाग पाडले. एखाद्या बाबीचा निषेध आपण कशा प्रकारे नोंदवतो, हे महत्त्वाचे आहे. कलावंतांनी नाटके लोकशाही पद्धतीने, मनापासून करत राहायला हवीत. नाटक यशस्वी होणार की अपयशी, हे प्रेक्षकांना ठरवू द्यायला हवे.
नाटकांच्या निर्मितीची संख्या वाढली असली तरी मोजकीच नाटके का चालतात, याचा सखोल विचार करायला हवा. नाटकांमधून नेमके चांगले काय देता येईल, याचा सखोल अभ्यास केल्यास यशस्वी नाटकांची संख्या नक्कीच वाढू शकते.
मी बऱ्याच नाट्यस्पर्धांमध्ये परीक्षक म्हणून काम पाहिले आहे. या स्पर्धांमध्ये सादर होणारी नाटके, हाताळले जाणारे विषय, तरुण कलाकारांकडून नाटकासाठी घेतली जाणारी मेहनत हे चित्र खूप आशादायी आहे. पुणे, मुंबई वगळता, महाराष्ट्राच्या विविध भागांतून अनेक तरुण विविध विषय घेऊन समोर येत आहेत ही जमेची बाजू आहे.
अनेक कलाकारांसाठी नाटकांमधून मालिका, चित्रपटांचे प्रवेशद्वार खुले होते. परंतु, नाटकातील जिवंतपणा इतर कोणत्याही माध्यमात अनुभवायला मिळत नाही. चित्रपटांतही आशयघन विषय हाताळले जात आहेत. त्यामुळे समांतर चित्रपट ही संकल्पना आता अस्तित्वात राहिलेली नाही. चांगले विषय हाताळताना निर्माते, दिग्दर्शकांना व्यावसायिक गणितेही सांभाळावी लागतात. केवळ प्रमोशन आणि गाण्यांचा भडिमार केला, तरच चित्रपट हिट होतो, हा फॉर्म्युला मागे पडला आहे. तरुण प्रेक्षकांना भावणारा, त्यांचे भावविश्व उलगडणारा सिनेमा असेल तर तोही चांगला व्यवसाय करतो.
सोशल मीडियाचे दालन आज सर्वांसमोर खुले आहे. या माध्यमातून आपण एकाच वेळी अनेकांशी संपर्कात राहू शकतो. मात्र, सोशल मीडियावर आपण कशा प्रकारे व्यक्त होतो, यावर सर्व गणित अवलंबून असते. सोशल मीडियाचा वापर करताना आपण कशा प्रकारे व्यक्त व्हावे, याची मर्यादा घालून यायला हवी. डेली सोपमुळे कथानकाची किंमत कमी होते, त्याचप्रमाणे, खासगी बाबी या व्यासपीठावर शेअर केल्या जात असल्याने त्याची किंमत कमी झाली आहे. विचार मांडण्याचे हे उत्तम व्यासपीठ आहे. त्यामुळे नाटक, चित्रपटांसाठीही सोशल मीडियाचा वापर योग्य पद्धतीने व्हायला हवा.