"नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करा पण जपूनच..." काेविड टास्क फाेर्स बैठक संपन्न

By ज्ञानेश्वर भोंडे | Published: December 29, 2023 05:50 PM2023-12-29T17:50:38+5:302023-12-29T17:51:06+5:30

‘जेएन-१’ या नवीन व्हेरियंटच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा 'कोरोना टास्क फोर्स'’ स्थापन...

"Celebrate New Year but carefully..." Covid Task Force meeting concluded | "नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करा पण जपूनच..." काेविड टास्क फाेर्स बैठक संपन्न

"नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करा पण जपूनच..." काेविड टास्क फाेर्स बैठक संपन्न

पुणे : कोरोनाचा ‘जेएन-1’ हा नवीन उपप्रकार घातक नसला तरी नागरिकांनी काळजी घ्यावी. नागरिकांनी घाबरून न जाता कोविड अनुरूप वर्तणुकीचे पालन करावे. नवीन वर्ष येत आहे. त्याचे सेलिब्रेशन करा, पण काळजी घ्या असे असे आवाहन आराेग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केले आहे.

‘जेएन-१’ या नवीन व्हेरियंटच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा 'कोरोना टास्क फोर्स'’ स्थापन करण्यात आली असून, या टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) संसर्गजन्य विभागाचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली या टास्क फोर्सची बैठक पार पडली.

या बैठकीला आरोग्य विभागाचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानचे संचालक धीरज कुमार, सर्व जिल्ह्यांचे सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिकांचे आयुक्त, जिल्हा आरोग्य अधिकारी, महापालिका आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, तसेच टास्क फोर्सचे सदस्य डॉ. माधुरी कानिटकर, डॉ. दिलीप म्हैसेकर, डॉ. राजेश कार्यकर्ते, डॉ. वर्षा पोतदार, डॉ. डी. बी. कदम, आरोग्य विभागाचे सर्व प्रमुख अधिकारी या बैठकीला दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला आरोग्य सेवा अतिरिक्त संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती आणि आरोग्य विभागाच्या तयारी संदर्भात सादरीकरण केले.

आराेग्यमंत्री सावंत म्हणाले, नवीन वर्षाचे आगमन होणार असल्यामुळे त्याचे स्वागत करण्यासाठी नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अशा वेळी लोक पर्यटनस्थळे, धार्मिक स्थळी जातात. मात्र नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी कोविड अनुरूप नियमांचे पालन करणे आणि काळजी घेणे आवश्यक आहे. जोखमीच्या रुग्णांनी अशा गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

नवीन वर्षाच्या स्वागतानंतर लोक परत आपापल्या घरी येतील, त्यामुळे हा विषाणूचा संसर्ग वाढण्याचा धोका अधिक आहे, त्यामुळे पुढील 10 ते 15 दिवस आरोग्य यंत्रणेने आणि नागरिकांनी सतर्क रहावे. टास्क फोर्सकडून आवश्यकतेनुसार मार्गदर्शक उपाययोजना सूचविल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. डॉ. गंगाखेडकर म्हणाले की, जेएन- 1 या कोरोनाच्या उपप्रकारामुळे मोठा धोका निर्माण होईल, अशी परिस्थिती सध्या नाही. मात्र तरीही वयोवृद्ध नागरिक आणि गंभीर आजाराच्या रुग्णांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

Web Title: "Celebrate New Year but carefully..." Covid Task Force meeting concluded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.