मांजरी बुद्रुकचा कचरा प्रश्न काही सुटता सुटेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:10 IST2021-04-17T04:10:15+5:302021-04-17T04:10:15+5:30
मांजरी : दररोज नागरिक नेहमीप्रमाणे विविध ठिकाणी रस्त्यालगत असलेल्या कचराकुंडीत कचरा टाकत आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून या कचराकुंड्यातील ...

मांजरी बुद्रुकचा कचरा प्रश्न काही सुटता सुटेना
मांजरी : दररोज नागरिक नेहमीप्रमाणे विविध ठिकाणी रस्त्यालगत असलेल्या कचराकुंडीत कचरा टाकत आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून या कचराकुंड्यातील कचराच उचलला जात नाही. परिणामी या कचराकुंड्या केव्हाच ओसंडून वाहत आहे. यावर प्रतिक्रिया विचारली असता अगोदरच कोरोनाच्या संकटाने त्रस्त झालेले नागरिक, माणसांचाच आता कचरा झाला आहे, अशी त्रासिक प्रतिक्रिया देत आहेत.
दुर्गंधीचे साम्राज्य पसरवणाऱ्या या रस्त्यालगतच्या कचऱ्यांच्या ढीगांकडे जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनचालकांना व नागरिकांना केवळ विस्मयाने पाहत राहणे, एवढेच काय ते शिल्लक राहिले आहे. त्यामुळे आता या कचराकुंड्या न राहता हे कचरा डेपो झाले आहेत की काय, अशी अवस्था सुमारे दीड लाख लोकसंख्येचा टप्पा गाठत असलेल्या आणि पुणे महानगरपालिकेत समाविष्ट होण्याच्या उंबरठ्यावर असणाऱ्या मांजरी गावची झाली आहे.
मांजरी बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीत दररोज सुमारे २५ ते ३० टन कचरा विविध ठिकाणी असलेल्या कचराकुंड्यात जमा होतो. हा कचरा गोळा करून ग्रामपंचायत आणि सिरम कंपनीच्या वाहनव्यवस्थेच्या सहकार्यातून, मुंढवा रोड लगतच्या गावाच्या हद्दीतील वनखात्याच्या अखत्यारित असलेल्या जागेत टाकला जातो. त्या लगतच संरक्षण खात्याची जमीनही आहे.
गेल्या पंधरा वर्षापासून या ठिकाणी कचरा टाकत असल्याचे सांगितले जाते. वेगाने नागरीकरण होऊ लागले तेव्हा या कचरा डेपोभोवती राहणाऱ्या रहिवाश्यांनी या डेपोस प्रचंड विरोध करण्यास सुरुवात केली व शेवटी हा कचरा डेपोचे स्थलांतर फुरसुंगी येथे करण्यात आले. तेथील नागरिकांचा विरोधही सर्वश्रुत आहे.
आता मांजरीच्या कचरा डेपोसही स्थानिक लोकांनी तसेच संरक्षण विभागाने कचरा आमच्या हद्दीत येत असल्याचे सांगत कचरा टाकण्यास प्रतिबंध केला आहे. कचरा व्यवस्थापनात, खतनिर्मिती, वीजनिर्मिती सारखे बहुउद्देशीय प्रकल्प उभे करून आणि ते सतत कार्यान्वित ठेवण्याची आर्थिक क्षमता ग्रामपंचायतीकडे नाही. जिथे महानगरपालिकेचे असे काही प्रकल्प धूळ खात पडलेले आहेत. त्यापुढे ग्रामपंचायतीची काय अवस्था होईल. कचरा डेपोच्या स्थलांतरास एवढी मोठी पर्यायी जागाही ग्रामपंचायतीकडे उपलब्ध असल्याचे दृष्टिक्षेपात नाही.
फोटोओळ- मांजरी गावात ठिकठिकाणी रस्त्यालगत असलेल्या कचराकुंड्या ओसंडून वाहत आहेत.