घंटानाद आंदोलनप्रकरणी चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:25 IST2021-09-02T04:25:56+5:302021-09-02T04:25:56+5:30
पुणे : पुण्यात कसबा गणपती मंदिरासमोर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंदिरे उघडावीत या कारणावरून आघाडी सरकारविरोधात ...

घंटानाद आंदोलनप्रकरणी चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
पुणे : पुण्यात कसबा गणपती मंदिरासमोर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंदिरे उघडावीत या कारणावरून आघाडी सरकारविरोधात घंटानाद आंदोलन करण्यात आले होते. कोरोना नियमांचे उल्लंघन करून आंदाेलन केल्याप्रकरणी पोलिसांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, प्रमोद कोंढरे, राजेश पांडे, स्वरदा बापट, हेमंत रासने, गणेश बिडकर, दीपक पोटे, राजेंद्र मानकर यांच्यासह ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यातील मंदिरे उघडावीत या कारणावरून सोमवारी भाजपने राज्यभरात आंदोलन केले होते. भाजपचे कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे यांनी आंदोलनासाठी परवानगी मागितली होती. पोलिसांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाला परवानगी नाकारली होती, असे असताना चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी यांनी कसबा गणपती मंदिरासमोर जमले. हातात झेंडे, बॅनर, टाळ घेऊन येऊन कसबा मंदिरासमोर घंटानाद करून शंख, टाळ वाजवून, स्पिकरवर आघाडी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. तेव्हा पोलिसांनी त्यांना कारवाई करण्यात येईल, अशा सूचना दिल्या. तरीही वरिष्ठ पोलीस अधिका-यांच्या सूचनांचे उल्लंघन करून आंदोलकांनी मंदिरात शिरण्याचा प्रयत्न केला. काही जणांनी मंदिराचे विश्वस्त संगीता ठकार यांच्या घरातून मंदिरात प्रवेश करून दर्शन घेऊन घंटानाद आंदोलन सुरू ठेवले. त्यामुळे कोरोना नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी १८८, २६९ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.