अर्थशास्त्रातील करिअरच्या संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:13 IST2021-03-17T04:13:36+5:302021-03-17T04:13:36+5:30

अर्थशास्त्रातील करिअरसाठी पदवी आणि पदव्युत्तर पदवीस्तरावर योग्य विषयाची निवड केली पाहिजे. कृषी अर्थशास्त्र, कृषिवित्त पुरवठा, सहकार, विकास व ...

Career opportunities in economics | अर्थशास्त्रातील करिअरच्या संधी

अर्थशास्त्रातील करिअरच्या संधी

अर्थशास्त्रातील करिअरसाठी पदवी आणि पदव्युत्तर पदवीस्तरावर योग्य विषयाची निवड केली पाहिजे. कृषी अर्थशास्त्र, कृषिवित्त पुरवठा, सहकार, विकास व नियोजनाचे अर्थशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध, आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था, आयात-निर्यात व्यापार, उपयोजित अर्थशास्त्र, ग्रामीण अर्थव्यवस्थेचे अर्थशास्त्र, श्रम-श्रमिकांचे अर्थशास्त्र, व्यवस्थापकीय अर्थशास्त्र, गुंतवणुकीचे अर्थशास्त्र, सार्वजनिक व्यापाराचे अर्थशास्त्र, इकॉनोमिट्रिक्स, सांख्यिकी अर्थशास्त्र या आणि अशा काही महत्त्वाच्या शाखांसह सुमारे २५ विषयशाखांचा अभ्यास मूलभूत अभ्यास म्हणून करावा लागतो. तसेच सद्यस्थितीतील समभाग बाजार, भांडवल बाजार, नाणेबाजार, बँकिंग, शासकीय धोरणे व निर्णय, आर्थिक संक्रमणावस्था, वित्तीय विश्लेषण, धोरण विश्लेषक, आदी विषयांमध्ये प्रावीण्य संपादन करून आपले करिअर चांगले करता येते.

----------------------------

अर्थशास्त्रात काय आहेत संधी?

- अर्थशास्त्रात पदवी, पदव्युत्तर पदवी, नेट-सेट पीएच.डी. करून चांगल्या महाविद्यालयात, विद्यापीठामध्ये अर्थशास्त्राचा अध्यापक- संशोधक म्हणून नोकरी मिळू शकते.

- शासनाच्या ध्येयधोरणाच्या निश्चितीमध्ये आपला सहभाग असावा, असे वाटणा-या करिअरिस्टिक विद्यार्थ्यांना इंडियन इकाॅनॉमिक सर्व्हिसेस (आयएफएस) या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत नशीब आजमावता येते.

- अर्थशास्त्र, सांख्यिकी अर्थशास्त्र, इकॉनाॅमॅट्रिक्स, संशोधनाची आवड असणा-यांसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेत विद्यार्थीदशेपासूनच संधी आहेत.

- पदव्युत्तर पदवी करत असताना आरबीआयची ‘यंगस्कॉलर’ची स्पर्धा परीक्षा देऊन थेट रिझर्व्ह बँकेच्या सेवेत पहिल्या टप्प्यावर दाखल होण्याची संधी आहे.

- आरबीआयच्या द्वितीय श्रेणीतील नोकरीच्याही संधी खास अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी असतात.

- आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, पुनर्निर्माण आणि विकासाठीची आंतरराष्ट्रीय बँक (जागतिक बँक) यांच्याही सेवा क्षेत्रात जाण्याच्या संधी आहे.

- सेबी, इंडियन बँक असोसिएशन, नॅशनल हाैसिंग बोर्ड, आयात-निर्यात बँक, ग्रामीण विकास बँक, लघुउद्योग विकास बँक, सहकारी बँका, यासारख्या ठिकाणी नोकरीच्या उत्तम संधी मिळू शकतात.

- शासन पातळीवर कररचना व कर आकारणी करण्यासाठी अर्थशास्त्रीय ज्ञानाची नितांत गरज आहे.

- शेतीशी संबंधित प्रश्नांचे उत्तरे शोधण्यासाठी कृषी अर्थशास्त्र अभ्यासकांची गरज सातत्याने भासत आहे.

- अर्थशास्त्रासोबत विधी, व्यवस्थापन, पर्यावरण, उत्पादन, वित्तीय संबंध यातील पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका पूर्ण केली तर आणखी चांगल्या संधी उपलब्ध होतात.

------------------------------

अर्थशास्त्राचे शिक्षण देणा-या शैक्षणिक संस्था

१) टाटा समाज विज्ञान संस्था, चेंबूर, मुंबई

२) गोखले अर्थशास्त्र संस्था, डेक्कन, पुणे

३) मुंबई स्कूल आॅफ इकॉनॉमिक्स, मुंबई विद्यापीठ

४) जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली

५) दिल्ली स्कूल आॅफ इकॉनॉमिक्स, दिल्ली विद्यापीठ, नवी दिल्ली

६) मद्रास स्कूल आॅफ इकॉनॉमिक्स, मद्रास

७) सिम्बायोसिस विद्यापीठ, पुणे

८) इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट आॅफ डेव्हलपमेंट रिसर्च, मुंबई

९) इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट,

१०) बनारस हिंदू विद्यापीठ

११) शांतिनिकेतन, कोलकाता

१२) कृषी संशोधन व विकास संस्था, बंगळुरू

------------------------

डॉ. अजय दरेकर, करिअर मार्गदर्शक, बारामती

(लेखक काकडे महाविद्यालयात अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक आहेत)

Web Title: Career opportunities in economics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.